पुणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला घेतली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे  एप्रिलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी एकू ण जवळपास साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी के ली आहे. त्यात पाचवीच्या साडेतीन लाखांहून अधिक, तर आठवीच्या अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, त्यानंतर परीक्षा अनिश्चित स्थगित करावी लागली.

परीक्षा कधी होणार या बाबत परीक्षा परिषदेकडून स्पष्टता देण्यात आली नसल्याने यंदा परीक्षा होणार की नाही, होणार असल्यास कधी असे प्रश्न विद्यार्थी-पालकांकडून विचारण्यात येत होते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षा परिषदेने राज्य शासनाला प्रस्ताव सादर के ला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता घेऊन परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.

करोना संबंधित नियमांचे पालन करण्याच्या अटींच्या अधीन राहून ८ ऑगस्टला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी स्पष्ट  केले आहे.