आरोग्य, पर्यावरण, वाहतूक, शिक्षण या सर्व क्षेत्रातील समस्या नर्मविनोदी व्यंगचित्रांमधून साकारणार. निमित्त आहे व्यंगचित्र महोत्सवाचे. विशेष म्हणजे ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांच्यासह राज्यातील विविध अनुभवी व्यंगचित्रकारांची चित्रेही या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.
सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाचवा व्यंगचित्र महोत्सव शनिवारपासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू होत आहे. २४ मे रोजी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण या वेळी उपस्थित राहणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. महोत्सवाचे संयोजक कैलास भिंगारे आणि कृष्णकांत कुदळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शरद मांडे, समीर गांधी, प्रशांत लासूरकर, संजय पवार या वेळी उपस्थित होते.
 महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनापूर्वी बालगंधर्वच्या प्रांगणात १०० फूट लांबीचा कॅनव्हास लावण्यात येणार असून ५० हून अधिक नवोदित व्यंगचित्रकार त्यावर समाजप्रबोधनाचा नर्मविनोदी पद्धतीने संदेश देणारी व्यंगचित्रे चितारणार आहेत. रविवारी बालगंधर्व कलादालनात सायंकाळी पाच वाजता ‘व्यंगचित्रे : राजकारण आणि संपादकीय भूमिका’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आणि ‘मी मराठी’ वाहिनीचे संपादक रवी आंबेकर या परिसंवादात आपली मते व्यक्त करतील. पालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक या वेळी उपस्थित राहणार आहेत.
हा महोत्सव २९ मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळात चालणार असून रसिकांना प्रदर्शनस्थळी व्यंगचित्रांच्या प्रात्यक्षिकांबरोबरच त्यांचे स्वत:चे अर्कचित्र काढून घेण्याचीही संधी मिळणार आहे.