आरत्या, गणपती बाप्पा मोरयाचा गजर यांनी नदीचे घाट सोमवारी भरून गेले होते. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी घरोघरी बसलेल्या गौरी आणि गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला. काही गणेश मंडळे आणि शाळा, महाविद्यालयांमध्ये बसवलेल्या गणपतींचेही विसर्जन झाले.
गौरी आणि गणपतींच्या विसर्जनासाठी नदीच्या घाटांवर गर्दी झाली होती. दुपारपासूनच विसर्जनासाठी गर्दी होऊ लागली होती. सायंकाळी पाच वाजल्यानंतर गर्दी वाढत गेली. विसर्जनासाठी मदत करायला घाटांवर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी वाढलेल्या गर्दीमुळे विसर्जनासाठी वाटही पाहावी लागत होती. अनेक रस्त्यांवर वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. शहरातील अनेक ठिकाणी विसर्जनासाठी हौद बांधण्यात आले होते. निर्माल्य टाकण्यासाठी कलशही ठेवण्यात आले होते. हौदात विसर्जन करण्यासाठीही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी गणेश मूर्तीचे हौदात विसर्जन करण्याबाबत जागृतीही करत होते. गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही अनेक संस्थांकडून केले जात होते. घरच्या गणपतींबरोबरच काही रहिवासी सोसायटय़ा, छोटी मंडळे, शाळा, महाविद्यालये यांनीही गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
वसतिगृहांच्या गणेशोत्सव मिरवणुकीत गुलालाचा वापर
शहरातील बहुतेक सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी वसतिगृहे या ठिकाणी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. बहुतेक संस्थांमध्ये पाच दिवसच गणपती बसवले जातात. शिक्षणसंस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन सोमवारी करण्यात आले. मोठी महाविद्यालये आणि वसतिगृहांमधील गणेशाच्या मिरवणुकाही काढण्यात आल्या. मात्र, एरवी वर्गामध्ये शिकलेला पर्यावरण अभ्यास या मिरवणुकांसाठी विद्यार्थ्यांनी गुंडाळूनच ठेवलेला दिसला. काही शिक्षणसंस्था आणि वसतिगृहांच्या मिरवणुकांमध्येही स्पीकरच्या िभती, गुलाल असे दृष्यच दिसत होते.
बहुतेक शाळांची ढोल पथके सोमवारी आपल्या शाळेच्या मिरवणुकीमध्ये व्यग्र असलेली दिसत होती. काही शाळांनी आपल्या संस्थेच्या आवारातच मिरवणुका काढल्या.