पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९ लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण ६ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना वाढत होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

वाकड परिसरात होणाऱ्या घरफोडयांचा तपास करत वाकड पोलिसांनी ६ आरोपीना अटक केली. तपासादरम्यान या आरोपींकडून ४ गुन्ह्यातील ९ लाख ५२ हजार ४०५ रुपयांचा ऐवज वाकड पोलिसांनी जप्त केला. यामध्ये रहाटणी परिसरात तीन महिन्यांपासून बंद असणा-या घराचे कुलुप तोडून घरातील दागिने पळवणा-या तीन चोरांनाही पोलिसांनी अटक केली.

फिर्यादीच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने घऱफोडी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार केदार वाल्मीक हजारे, अक्षय प्रकाश सस्तरे, ओमकार नागनाथ अलंगे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २९० ग्रॅम वजनाचे ८ लाख ४९ हजार ३२६ रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही घऱफोडी अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी उघडकीस आणली.

तर कस्पटेवस्ती येथे घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारणा-या नोकरालाही वाकड पोलिसांनी अटक केली आहे. लोकबहाद्दूर लालबहाद्दूर शाही, नामराज महारुप शाही अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही मुळचे नेपाळचे असून त्यांच्याकडून १५ ग्रॅम वजनाचे ४५ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत. ही घऱफोडी २८ मे रोजी पहाटे घडली होती. तसेच आणखी एका आरोपीकडून सॅमसंगचा स्मार्ट फोन, दोन लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यालाही अटक कऱण्यात आली आहे.