तीन दिवसांत सव्वालाखांचा टप्पा पार जाण्याची शक्यता

नववर्षांचे स्वागत करताना उत्साह द्विगुणित करण्यासाठी अनेक जण विशेषत: तरुणांकडून मद्यपान केले जाते. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी मद्यप्राशन करण्यासाठी तब्बल ६० हजार जणांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत हाच आकडा सव्वालाखांपर्यंत जाण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी व्यक्त करण्यात आली. एक दिवसाचा परवाना घेणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यंदा २० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे निरीक्षण या विभागाकडून नोंदविण्यात आले आहे.

नववर्षांचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येतो. मद्यप्राशन करून नववर्षांचे स्वागत करण्याकडे कल वाढला आहे. पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीने त्या दिवसासाठी एक दिवसाचा मद्यपरवाना घेण्याकडे कल वाढला आहे. मद्य प्राशन करण्यासाठी एक वर्ष, सहा महिने आणि एक दिवस अशा कालावधींसाठी मद्य परवाना दिला जातो. या परवान्यांमध्ये देशी व विदेशी मद्यपरवान्यांचा समावेश आहे. शहर आणि परिसरात दोन्ही प्रकारचे मिळून तब्बल ६० हजार परवाने गुरुवापर्यंत देण्यात आले. हे परवाने केवळ एका आठवडय़ात देण्यात आले असून त्या आधी देखील अनेक जणांनी ३१ डिसेंबरसाठी मद्य परवाने घेतले असण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत आणखी ६० हजार मद्यपरवान्यांकरिता मागणी येईल, असा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. एक दिवसांचे मद्य परवाने घेणाऱ्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. एक दिवसाचा परवाना शहर आणि जिल्ह्य़ात कुठेही चालणार आहे.