24 September 2020

News Flash

करोना रुग्णांसाठी रेल्वेचे ६० डबे अद्यापही वापराविना

राज्य शासनाकडून अद्याप मागणी नसल्याचे रेल्वेचे स्पष्टीकरण

करोना रुग्णांसाठी पुणे रेल्वेकडून एकूण साठ डबे घोरपडी यार्डात सज्ज ठेवण्यात आले आहेत.

राज्य शासनाकडून अद्याप मागणी नसल्याचे रेल्वेचे स्पष्टीकरण

पुणे : करोना रुग्णांच्या उपचारासाठी अंतर्गत रचनेत अंशत: बदल करून मे महिन्यापासून तयार ठेवण्यात आलेले पुणे रेल्वेचे साठ डबे अद्यापही यार्डामध्ये वापराविना आहेत. या डब्यांमध्ये एक हजारांच्या आसपास रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. मात्र, संबंधित डब्यांबाबत राज्य शासनाकडून मागणी आलेली नाही, ती आल्यास कोणत्याही दिवशी हव्या त्या स्थानकावर डबे पोहोचविण्यास रेल्वे सज्ज असल्याचे स्पष्टीकरण पुणे रेल्वेकडून देण्यात आले आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आणि रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होण्यास अडचणी येत असताना रेल्वेच्या डब्यांच्या अंतर्गत रचनेत काहीसा बदल करून त्या ठिकाणी रुग्णावर उपचाराची, विलगीकरणाची व्यवस्था करण्याचा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुणे रेल्वेकडून घोरपडी यार्डामध्ये एप्रिलच्या अखेरीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. सध्या विशेष गाडय़ा वगळता सर्व रेल्वे बंद असल्याने या गाडय़ांचे डबे रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले.

पुणे रेल्वेकडून टप्प्याटप्प्याने एकूण ६० डबे उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. रेल्वेने या डब्यांच्या अंतर्गत रचनेत काहीसे बदल केले आहेत. एका डब्यामध्ये समोरासमोर आसनाचे नऊ विभाग असतात. त्यातील एक विभाग वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवून इतर आठ विभागांमध्ये दोन आसनांवर रुग्णांसाठी खाटेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विभागातील मधली दोन आसने (स्लीपर बर्थ) काढण्यात आली आहेत. खिडक्यांना जाळ्या आणि ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यासाठीही व्यवस्था देण्यात आली आहे.सध्याही शहर आणि परिसरात करोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.

राज्य शासनाच्या मागणीनुसारच करोना रुग्णांसाठी अंतर्गत रचनेत काही बदल करून रेल्वेकडून ६० डबे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या वापराबाबत शासनाकडून अद्याप मागणी करण्यात आलेली नाही. तशी मागणी झाल्यास आवश्यकतेनुसार कोणत्याही स्थानकावर डबे पोहोचविण्यासाठी रेल्वेची तयारी आहे.

– मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 3:09 am

Web Title: 60 train coaches still unused for corona patients zws 70
Next Stories
1 उद्योगनगरीतील प्रमुख मंडळांचा जनजागृतीचा निर्धार
2 ‘सीईटी’बाबत आठ दिवसांत निर्णय
3 पुण्यात दिवसभरात ३५ करोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले १०९१ रुग्ण
Just Now!
X