संपूर्ण जग करोना प्रतिबंधक लशीकडे डोळे लावून बसले असताना, भारतातील ६१ टक्के नागरिक मात्र लस आली तरी २०२१ मध्ये ती टोचून घेण्याबाबत साशंक आहेत. नवी दिल्ली येथील ‘लोकल सर्कल्स’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

देशातील २२५ जिल्ह्य़ांमधल्या २५ हजारहून अधिक नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. सुमारे दोन हजार नागरिक महाराष्ट्रातील आहेत. २०२१ च्या पूर्वार्धात करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली, तर लगेच ती लस टोचून घेऊन मोकळेपणाने आयुष्य जगायला आवडेल का? असे विचारण्यात आले असता ६१ टक्के नागरिकांनी लशीबाबत साशंक असल्याने लगेच ती टोचून घेणार नसल्याचे म्हटले आहे. १२ टक्के नागरिकांनी लस टोचून घेणार मात्र कोविडपूर्व जीवनशैली सुरू करणार असल्याचे सांगितले. २५ टक्के नागरिक लस टोचून घेणार मात्र जीवनशैली पूर्ववत करणार नसल्याचे सांगतात. १० टक्के नागरिक मात्र २०२१ मध्ये लस घेणार नसल्याचे सांगतात.

करोना काळात साथीच्या प्रतिबंधासाठी घालण्यात आलेले निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. देशातील बहुतांश व्यवहार पूर्ववत होताना दिसत आहेत, मात्र मार्च २०२१ पर्यंत काही बंधने पाळून राहण्याची तयारी ६३ टक्के नागरिकांनी दाखवली. देशातील निर्बंध उठवण्यात आल्यानंतर पाच टक्के नागरिकांमध्ये उत्साह आहे. १९ टक्के नागरिकांना निर्बंध नाहीत म्हणून आनंद आहे. मात्र १३ टक्के नागरिकांत नैराश्य, तर ३३ टक्के नागरिकांमध्ये काळजी आणि भीती आहे. कोविड प्रतिबंधात्मक निर्बंधांसह किती काळ राहण्याची तयारी आहे, या प्रश्नावर ६३ टक्के नागरिकांनी मार्च २०२१ पर्यंत निर्बंधांसह राहण्याची तयारी दर्शवली आहे. १४ टक्के नागरिक डिसेंबर २०२० पर्यंत निर्बंधांसह राहायला तयार आहेत.

लोकांचे मत काय? : करोना प्रतिबंधक लस २०२१ मध्ये उपलब्ध झाल्यानंतर लगेच ती घेऊन पूर्ववत आयुष्य जगायला आवडेल का, या प्रश्नावर ८३१२ नागरिकांनी नोंदविलेले मत..

* ६१ टक्के  – लशीबाबत साशंक असल्याने लगेच टोचून घेण्याची घाई नाही.

* १२ टक्के  – लस टोचून कोविडपूर्व जीवनशैली अंगीकारणार.

* २५ टक्के  – लस घेणार मात्र कोविडपूर्व जीवनशैली नको.

* १० टक्के  – लसच नको.