ऑनलाइन कर भरण्याचे प्रमाण ६५ टक्के

पुणे : महापालिकेचा मिळकतकर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याअखेपर्यंत २२५ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून त्यापैकी ६५ टक्के मिळकतधारकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन २०१९-२० या वर्षांसाठीच्या मिळकतकराच्या देयकांचे वाटप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मे अखेपर्यंत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना पाच ते दहा टक्क्य़ांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्यानुसार मिळकतकर स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कर भरण्यासाठी नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयासह कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नेटबँकिंग, डेबिट आणि क्रेडीट कार्डबरोबरच पंधरा प्रकारच्या सुविधांचा समावेश या प्रक्रियेत आहेत. त्याला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. सध्या २२५ कोटी रुपयांपैकी ६५ टक्के रक्कम ही ऑनलाइन पद्धतीने जमा झाल्याची माहिती कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

महापालिकेला डिजिटल पेमेंट श्रेणीमधील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत (२०१८-१९) वर्षभरात केवळ ४६ टक्के जणांनी ऑनलाइन भरणा केला होता. यंदा मात्र एप्रिल महिन्यातच हे प्रमाण ६५ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. चालू आर्थिक वर्षांत कर आकारणी आणि करसंकलन विभागाला एकूण १ हजार ७२१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ मे पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ७०० कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज असून ऑनलाइनचे प्रमाण ८५ टक्क्य़ांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

शहरातील नऊ लाख २७ हजाराहून अधिक नागरिकांना मिळकतकराच्या देयकांचे वाटप करण्यात आले आहे. टपालाद्वारे देयकांचे वाटप करण्यात येत असून वाटपाची प्रक्रिया ८० ते ८५ टक्क्य़ांपर्यंत पूर्ण झाली आहे. मिळकतकर भरणाऱ्यांचे मोबाइल क्रमांक कर संकलन विभागाकडे आहेत. मिळकतकर पाठविल्याची माहिती या सर्वाना लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) दिली जात आहे.

१ लाख ३२ हजार धारक

शहरातील नऊ लाख २७ हजार मिळकतधारकांपैकी आतापर्यंत २ लाख २७ हजार नागरिकांनी एकूण २२५ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. त्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने कर भरलेल्यांची संख्या १ लाख ३२ हजाराहून अधिक आहे.