कामावरची दिवाळी

दिवाळी म्हटले की घरातील साफसफाई ठरलेलीच असते. घरातील टाकाऊ आणि अनावश्यक वस्तू बाहेर काढल्या जातात. त्यामुळे साहजिकच कचऱ्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ होते. या परिस्थितीमध्ये शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी येऊन पडते ती पालिकेच्या कचरावेचकांवर! त्यामुळे दिवाळीचा सण असूनही केवळ अर्ध्या दिवसांची सुट्टी घेऊन महापालिकेचे तब्बल साडेसहा हजार सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवताना दिसतात. कोणताही अतिरिक्त मोबदला किंवा मुशाहिरा न घेता बिनबोभाट शहर स्वच्छतेचे काम या सफाई कर्मचाऱ्यांकडून सुरू असते.

कोणताही सण किंवा उत्सव म्हटले की दैनंदिन कचऱ्यामध्ये दुपटीने वाढ होते. दिवाळीच्या कालावधीत तर फटाक्यांचा अतिरिक्त कचराही रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज सांभाळून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना या कचऱ्याचे संकलन करावे लागते. महापालिकेच्या कर्मचारी आणि खासगी ठेकेदाराकडील कर्मचारी असे एकूण साडेसहा हजार सफाई कर्मचारी सेवेत आहेत. सणाच्या दिवशी परिसरात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून होत असते. त्यातच अतिरिक्त कचरा उचलण्याचे अचूक नियोजन या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पातळीवर केले जाते. दिवाळी असली तरी अतिरिक्त काम या कर्मचाऱ्यांना नसते. मात्र ठरलेल्या कालावधीतच शहर स्वच्छ ठेवण्याचे काम  होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आली. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्षातील कामाला सकाळी सहा वाजता सुरुवात होते. उत्सवाच्या कालावधीत थोडे उशिरापर्यंत काम करावे लागते, असे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दिवाळी दूरच आहे!

पुणे  : दसरा संपतो न संपतो तोच आपल्याला दिवाळीचे वेध लागायला सुरुवात होते.. घराची सजावट, खरेदी, फराळाचे पदार्थ, सहली यांचे नियोजन केले जाते आणि तेव्हापासूनच दिवाळी साजरी व्हायला सुरुवातही होते. पण आपल्या आजूबाजूच्या अनेकांची दिवाळी या झगमगाटापासून आजही लांब आहे.

दररोज आपल्या घरी येणारे कचरावेचक हे त्यातलेच एक. सणवार म्हटले की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ हवा असे सगळ्यांनाच वाटते. पुणे शहरातील सुमारे २८०० कचरावेचक नेहमीच्या दुप्पट काम करून या काळात स्वच्छतेचे काम करत असतात. ‘स्वच्छ’ या संस्थेमार्फत हे कचरावेचक शहरभर स्वच्छतेचे काम करतात. दररोज स्वच्छचे कर्मचारी साडेपाच लाख घरांमध्ये जातात. कचरा गोळा करणे, त्याचे ओला, सुका असे वर्गीकरण करणे, तो वाहून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे अशी कामे ते करतात. दिवाळीचे दिवसही त्याला अपवाद नाहीत.

दिवाळी म्हटले की आपल्या दरवाजातला कचरा लवकर उचलला जावा असे लोकांना वाटते. त्यामुळे कचरावेचकांना एरवीच्या तुलनेत लवकरच कामाला सुरुवात करावी लागते. दिवाळी आहे तर कचरा उचलायला नको असे म्हणता येत नाही. कारण काम केले तर पैसे मिळणार आणि पैसे मिळाले तर मुलांसाठी गोडाधोडाचे करता येणार. कचरा उचलायला जातो तेव्हा काही घरातले लोक दिवाळीचा फराळ, मिठाई असे पदार्थ देतात.

शिल्लक राहिलेले फटाके देतात, त्यावरच मुलांची दिवाळी उरकावी लागते, असा अनुभव भावना स्वच्छच्या कचरावेचक महिलांनी सांगितला.

सोसायटय़ांच्या बाहेर घंटागाडी घेऊन जाणे, त्यांनी दिलेला कचरा गोळा करून, वेगळा करून तो वाहून नेणे हेच याही दिवसात आमचे काम असते. दिवसभर कचऱ्याची गाडी वाहून नेल्यानंतर अंघोळ करायला मिळाली तरी पुरेसे आहे. अभ्यंगस्नान, फराळ वगैरे गोष्टींपासून आमची दिवाळी दूरच आहे अशी भावनाही घंटागाडीचे चालक व्यक्त करतात.