News Flash

या रे नाचू अवघे जन भावे प्रेमे करून

पद्मा शंकर यांचे कर्नाटक शैलीत व्हायोलिनवादन झाले. गणेश वंदना राग ‘हंसध्वनी’त सादर केली.

६५ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सत्र पाचवे

६५ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सत्र पाचवे

शनिवारच्या सत्रात प्राची शहा यांचे कथ्थक नृत्य झाले. नृत्याच्या माध्यमातून पौराणिक कथा सादर करणे हा मुख्य गाभा. या भोवती हे समस्त नृत्य फिरत असते. सर्वप्रथम गुरू तसेच गणेशवंदना ज्याला अलारिपु म्हणतात, ते मोठय़ा अदाकारीने झाले. यानंतर अनुलोम-प्रतिलोम हे पदन्यासाचे प्रकार, त्यानंतर तबल्याचे बोल मुखाने म्हणणे ज्याला पढन्त म्हणतात व त्यानुसार तिल्लाना म्हणजे लयकारी करत घुंगरांच्या सुंदर आवाजात नृत्य करत अवघे व्यासपीठ आपल्या पदन्यासाने व्यापून टाकले. उदगाता पं. गुरू गणेश हिरालाल व वाद्यवृंद समूहाने या कथकात चैतन्य आणून रसिकांची मोठी दाद मिळविली. ‘या रे नाचू अवघे जन। भावे प्रेमे करून।’ अशी मनाची अवस्था सर्व रसिकांची झाली होती.

ग्वाल्हेर, जयपूर- अत्रौली किराणा अशा विविध घराण्यांची गायकी आत्मसात केलेल्या गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचे गायन झाले. सादरीकरणासाठी त्यांनी ‘भूप’ हा ‘कल्याण’ थाटातील रागांचा राजा निवडला. मध्यलय त्रितालात ‘जबसे तुम्ही संग’ ही बंदिश शिस्तबद्ध पण सहजता व आस्वादक स्वर कल्पनाविलासाने गायली. तार सप्तकाकडे जाण्याची घाई नाही असे संमयी स्वरांवर मन:स्वी प्रेम करणारे गाणे क्वचितच ऐकावयास मिळते. ‘झुम मधुबन माने’ ही द्रुत त्रितालातील बंदिश व तराणा सुरेख सादर केला. यानंतर ‘जोगकंस’ या रागातील ‘पिर पराई’ ही चीज भावनेने ओतप्रोत भरलेल्या स्वरांनी सादर केली. ‘ब्रह्मचैतन्यासारखा’ हा अभंग उत्कट भावाभिव्यक्तीने सादर केला.

या महोत्सवात मिरजकरांनी सोन्याच्या तारा असलेल्या ४ तंबोऱ्याच्या जोडय़ा (भीमसेनजींची प्रतिमा असलेल्या) सप्रेम भेट दिल्या. पण या आधीच २७ वर्षांपूर्वी आकाशवाणी पुणे केंद्राने एक असाच जैव तंबोरा आर्य संगीत प्रसारक मंडळास दिलेला आहे, ज्याला चार सुरेल तारा आहेत. प्रेम, जिव्हाळा, मधूर धीराची वाणी व संगीतासाठी जन्मलेल्या या संस्थेवरील निष्ठा. या तारा कायमस्वरूपी सुरेलच राहतात. त्यांना खुंटीने पिळावे लागत नाही. पं. भीमसेनजींची स्मरणादर प्रतिमा कायमच हृदयावर कोरलेली आहे. अशा या सुरेल तंबोऱ्याचे नाव आहे आपले आनंद देशमुख. पुढील सांगीतिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा.

रविवारी अखेरच्या सत्रात महेश काळे यांचे गायन होते. त्यांनी ‘शुद्ध सारंग’ या विलंबित ‘झुमरा’ तालातील बंदिश निवडली. बोल होते ‘तपनलागी रे.’ त्यांना तबलासाथ निखिल फाटक, पखावज प्रसाद जोशी, तर व्हायोलिनसाथ रमाकांत परांजपे यांनी केली. त्यांनी द्रुत झपतालात ‘येरी मोरी माई’, ‘आनंद मनावो’ व शेवटी ‘तराणा’ त्रितालात सादर केला. ‘अवघे गरजे पंढरपूर’ हा अभंग सादर केला. जव्हारयुक्त आवाज, अंगभूत लय, सर्जनशीलता असे अनेक दैवी गुण लाभल्यामुळे सर्वागसुंदर असे हे गायन झाले. बोलआलाप, बोलताना अलंकारिक तसेच ‘सरगम’च्या ताना, अनेक ठिकाणी घेतलेली सूंथ, तार सप्तकातील पुकार, वेगवान तराणा व त्याची तंतकारीबाबत मनासी टाकिले मागे। गतीसी तुळणा नसे।। एवढेच इथे म्हणावेसे वाटते.

पद्मा शंकर यांचे कर्नाटक शैलीत व्हायोलिनवादन झाले. गणेश वंदना राग ‘हंसध्वनी’त सादर केली. त्यानंतर चारुकेशीतील गत. शेवटी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर केला. सवाल-जवाब मृदंगम तसेच खंजरीवर झाले. पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी ‘भीमपलास’ हा बडा ख्याल सादरीकरणासाठी निवडला. ‘अब तो बडी देर’ ही चीरपरिचित बंदिश मोठय़ा नजाकतीने सादर केली. बालगंधर्व यांचा ‘भीमपलास’ अतिशय आवडता राग होता. खर्जाचे पंचमापर्यंत आलापाचा विस्तार, आलापात लयकारी, तीनही सप्तकात फिरणाऱ्या संचारीच्या ताना दाद देऊन गेल्या. ‘बिरज मे धूम मचायी श्याम’ ही द्रुत त्रितालात बांधलेली चीज सुरेख होती. शेवटी ‘हिंडोल’ या रागावर आधारित ‘ज्ञानियांचा राजा। गुरुमहाराव।।’ भक्ती भावाने गायला. त्यांच्या साथीला- स्वरसंवादिनीवर प्रभाकर पांडव, तबला नंदकिशोर तर पखावजवर- गंभीर महाराज होते.

पं. राजन व सारंग कुलकर्णी यांचे सरोदवादन झाले. स्वरांचा ज्यातून उदय होतो, ते ‘स्वरोदय’ हे वाद्य पुढे सरोद झाले असे मानले जाते. मैहर घराणे हे पद्मभूषण अल्लाउद्दिन खानांपासून सुरू होते. अली अकबर खाँ- सरोद, पं. रविशंकर- सतार तर पं. पन्नालाल घोष- बासरी, पं. व्ही. जी. जोग- व्हायोलिन असे मोठे कलाकार या मैहर घराण्याने दिले. ही श्रेष्ठ परंपरा पं. राजन व सारंग चालवित आहेत, तेही पुण्यात. आजच्या सादरीकरणात ‘वाचस्पती’ हा ओडव संपूर्ण जातीचा राग सहसा वाजविला न जाणारा निवडला. धृपद अंगाने आलापी झाली. नंतर झपतालातील गत वाजविली. या वाद्याला स्वरांचे पडदे नाहीत. त्यामुळे घसीट खूप पल्लेदार निघते. याच रागातील समेपासून तोंड असलेली गत खूप श्रवणीय होती. स्थायी वर्णाचा गमकयुक्त जमजमा, आंदोलने त्या त्या स्वरांचे महत्त्व विशद करीत होते. वेगवान ताना, सवाल-जवाब अतिशय सुरेख जमले.

आनंदगंधर्व- आनंद भाटे यांनी ‘यमन कल्याण’ रागाने सुरुवात केली. विलंबित एकतालातील या बंदिशीचे बोल होते ‘अवगुण न किजे’ तर द्रुत छोटय़ा ख्यालाचे बोल होते ‘येरी आली पिया बीन.’ ‘भाग्यदा लक्ष्मी..’ हे पं. भीमसेनजींनी चिरंजीव केलेले कानडी भजन भावपूर्ण अंत:करणाने त्यांनी सादर केले. भीमसेनजींची छाप भाटे यांच्या गायनावर पडली आहे. घरंदाज गायकी, लांबलचक आलाप, ताना यांनी हे गायन गाजले. तबलासाथ भरत कामत तर, स्वरसंवादिनी सुयोग कुंडलकर यांची होती. यानंतर उस्ताद शुजात खाँ यांचे सतारवादन झाले. त्यांनी ‘झिंझोटी’ हा राग सादरीकरणासाठी निवडला. संथपणे अनिबद्ध आलापी सुरू झाली. वादी संवादी स्वरांचे भान राखत ‘झिंझोटी’च्या अनेक स्वरसंगतीने पालुपदे वापरून, विविध छटा व दृष्टिकोन श्रोत्यांपुढे उभे करीत होते.

स्वर सोहळ्याचे अंतिम पुष्प गुंफले ते स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी. स्वरसंवादिनीवर सुयोग कुंडलकर तर तबल्यावर माधव मोडक होते. सर्वप्रथम ‘जोगकंस’ मध्ये बडा ख्याल सादर केला. बोल होते, ‘जगत सपना.’ विलंबित एकतालात जोगिणीच्या विरहव्यथा हळुवारपणे मांडल्या. असे बंदिशीच्या काव्यातील अर्थाकडे लक्ष देऊन, ‘दिल है नाजूक मेरा। शिशेसे भी टूटे न कही।’ या काव्यपंक्तीनुसार एवढी काळजी घेऊन गायलेली बंदिश रसिकांच्या थेट हृदयात कोरली जाते. प्रभा अत्रे यांनी याच भावनेची कदर करीत आलापांनी हे हृदयगीत चालू ठेवले. तबल्याची प्रत्येक मात्रा ही हृदयाची स्पंदने वाटत होती. असा हा ‘जोगकंस’ हे भावपूर्ण गीत खूप भावले.

(लेखक संगीत समीक्षक व बासरीवादक आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:37 am

Web Title: 65th sawai gandharva bhimsen festival fifth session
Next Stories
1 ‘लोकसत्ता’च्या वार्ताहरास मारहाण करणाऱ्या नीलेश मोरे यांची पोलीस कारकीर्द वादग्रस्तच
2 शिक्षण आणि न्यायव्यवस्थेत बदलासाठी आराखडा आवश्यक
3 पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
Just Now!
X