अभिजात संगीताच्या प्रांतात जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास’ आज उत्साहात प्रारंभ झाला. ‘षड्ज’ व ‘अंतरंग’ या दोन कार्यक्रमांनी महोत्सवाची सुरूवात झाली. या महोत्सवाचे हे ६७ वे वर्षे आहे. पुण्यातील गंधर्व स्मारक येथे ११ व १२ डिसेंबर रोजी ‘षड्ज’ व ‘अंतरंग’ हे दोन विशेष कार्यक्रम या महोत्सवांतर्गत होणार आहेत.

‘षड्ज’ अंतर्गत आज दिग्दर्शक व्ही. पाकिरीसामी यांचा ‘पंडित रामनारायण – अ ट्रिस्ट विथ सारंगी’ व त्यानंतर एस. एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’ हे लघुपट दाखविण्यात आले. ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ मध्ये पहिल्या दिवशी अमरेंद्र धनेश्वर यांनी प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत घेतली.

महोत्सवादरम्यान होणारे प्रकाशचित्र प्रदर्शन हे रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या प्रकाशचित्र प्रदर्शनाचे हे सलग १३ वे वर्ष असून यावर्षी ‘स्वर शताब्दी’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारलेले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील चार प्रतिभावंत कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष २०१९ – २० या वर्षात साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये उस्त्ताद अल्लारखाँ,  पं. फिरोज दस्तूर,  पं. रविशंकर आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांचा समावेश आहे. या वर्षीच्या ‘स्वर शताब्दी’ प्रदर्शनात या चारही दिग्गज कलाकारांच्या प्रकाशचित्रांचा समावेश आहे. या निमित्ताने या चारही कलाकारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. महोत्सवाच्या पाचही दिवशी मुख्य मंडपाच्या मागे असलेल्या स्वतंत्र मंडपात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.