खडकवासला आणि पवना धरणातील पाणीसाठा ऐंशी टक्क्य़ांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून दोन्ही धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. धरण परिसरात रविवारी दिवसभर चांगला पाऊस झाला. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणात ८०.६६ टक्के पाणीसाठा झाला. तर पवना धरणात ८२.१९ टक्के पाणीसाठा झाल्यामुळे या दोन्ही धरणातून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाणी सोडायला सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीला दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडले जाईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांनी दिली.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांतील एकूण पाणीसाठा ६८.१६ टक्के झाला आहे. रविवारी दिवसभरात टेमघर धरणात ४० मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण पाणीसाठा ५४ टक्के झाला आहे. तर वरसगाव येथे वीस मिलीमीटर पाऊस झाला असून या धरणातील पाणीसाठा ६१.४० टक्के झाला आहे. पानशेत धरण परिसरात २३ मिलीमीटर पाऊस झाला असून पाणीसाठा ७९.७१ टक्के झाला आहे.