६५ हजारांहून अधिक थकबाकीदारांची वीज तोडली

पुणे : पुणे, िपपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्य़ामध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे वीजबिलाची तब्बल ६८७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई तीव्र करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांत ६५ हजारांहून अधिक थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली आहे. कारवाईमुळे अनेकांकडून थकबाकीचा भरणाही केला जात आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये अत्यंक कमी थकबाकी होती. वीजबिले नियमित भरणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील ग्राहकही आघाडीवर होते. मात्र, करोना संसर्गाच्या टाळेबंदीनंतर एकूण राज्यातच वीजबिलांची थकबाकी वाढली. पुण्यात आणि जिल्ह्य़ातही वीजबिल थकबाकीत झपाटय़ाने वाढ झाली. अगदी सलग नऊ ते दहा महिने वीजबिल न भरणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात गेली. टाळेबंदीच्या कालावधीत आणि डिसेंबर २०२० पर्यंत थकबाकीदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मात्र जानेवारीपासून हळूहळू कारवाई सुरू केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीतही कारवाई थांबविण्यात आली होती. त्यानंतर मात्र ती तीव्र करण्यात आली आहे.पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील १० लाखांहून अधिक ग्राहकांकडे वीजग्राहकांकडे ६८७ कोटी रुपयांच्या वीजबिलाची थकबाकी आहे. त्यामुळे दररोजच काही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. आजवर शहर आणि जिल्ह्य़ात ६५ हजारांहून अधिक थकबाकीदारांवर वीज तोडण्याची कारवाई केली आहे. मार्च अखेरीमुळे ही कारवाई पूर्वीपेक्षा तीव्र करण्यात आली आहे. ग्राहकांना चालू वीजबिले आणि थकबाकीचा भरणा करता यावा, यासाठी शासकीय सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती.

पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक थकबाकी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांच्या तुलनेत पुणे जिल्ह्य़ामध्ये वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीत पुणे जिल्ह्यत सुमारे १० लाख ग्राहकांकडे ६८७ कोटींची थकबाकी आहे.कोल्हापूर जिल्ह्यत ४ लाख ३६ हजार ३८ ग्राहकांकडे २३१ कोटी १५ लाख, सांगली जिल्ह्यत २ लाख ६० हजार ७९८ ग्राहकांकडे १२० कोटी ४३ लाख, सोलापूर जिल्ह्यत ३ लाख २६ हजार ५५५ ग्राहकांकडे १६४ कोटी ८३ लाख आणि सातारा जिल्ह्यत १ लाख ८९ हजार ७७५ ग्राहकांकडे ६३ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी आहे.