शहरात झालेल्या घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांनी दागिने आणि रोकड असा सात लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास केला. वारजे आणि वडगाव बुद्रुक परिसरात या घटना घडल्या.
मनीषा देवांक (वय ४५, रेणुकानगर, वारजे) यांनी या संदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवांक कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरटय़ांनी देवांक यांच्या सदनिकेचा दरवाजा तोडला. कपाटातील अकरा हजार रुपये आणि दागिने असा तीन लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश महामुणकर तपास करत आहेत. दरम्यान वडगाव बुद्रुक येथील चरवडनगर येथे राहणारे संपत सोपान पवार हे महावितरणमध्ये कामाला आहेत. गुरुवारी रात्री ते घराच्या छतावर झोपले होते. धनकवडी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांना तातडीने तेथे जाण्याची सूचना महवितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. मध्यरात्री पवार तेथे गेले. चोरटय़ांनी पवार यांच्या घराचे लोखंडी ग्रील उचकटून प्रवेश केला. चोरटय़ांनी कपाटातील चार लाख ५४ हजारांचे दागिने लांबविले. पवार काम आटोपून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पवार यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.