टाळेबंदीनंतर वाहने परत

पुणे : संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून पोलिसांनी आतापर्यंत ६ हजार ८८६ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून ही वाहने टाळेबंदी उठल्यानंतर दुचाकीस्वारांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर काही जण विनाकारण शहरात फिरत आहेत. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली असून टाळेबंदी झाल्यानंतर आतापर्यंत शहरात सात हजार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने टाळेबंदी उठल्यानंतर ताब्यात दिली जाणार आहेत. सध्या दुचाकी वाहने शहरात वेगवेगळ्या भागात असलेल्या पोलीस ठाण्यांच्या आवारात तसेच परिसरात लावण्यात आली आहेत.

पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील प्रमुख चौकात नाकाबंदी केली असून १२१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांना नोटिस बजाविण्यात आल्या आहेत. दुचाकीस्वारांना दंडही भरावा लागणार आहे.आतापर्यंत ९ हजार १८७ जणांना नोटिस बजाविण्यात आल्या आहेत. नोटिस बजावण्यात आलेल्या नागरिकांनी समाधानकारक खुलासा करणे गरजेचे आहे. त्यांनी खुलासा न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. नागरिकांनी करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. आवश्यक असेल तर घरातून बाहेर पडावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.