पुणे : आधार केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना जाणीवपूर्वक सहा महिन्यांनंतरची तारीख देणे, अतिरिक्त शुल्क घेणे, कागदपत्रांची शहानिशा न करता आधार नोंदणी किंवा दुरूस्ती करणे, बनावट बोटांचे ठसे घेऊन गैरव्यवहार करणे, आधार यंत्रांमध्ये फेरफार करणे असे गैरप्रकार केल्याप्रकरणी शहर तसेच जिल्ह्य़ातील तब्बल ७० आधार केंद्रचालकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात आधारची कामे खासगी कंपन्यांकडून काढून सरकारी कंपनी असलेल्या महाऑनलाइनकडे देण्यात आली आहेत. परंतु, शहर आणि जिल्ह्य़ात आधार केंद्रांची संख्या कमी असताना जाणीवपूर्वक आधार केंद्र चालकांकडून सहा महिन्यांनंतरचे टोकन नागरिकांना देण्यात येत होते. ज्या नागरिकांना तातडीने आधार नोंदणी किंवा दुरूस्ती करणे आवश्यक होते, अशांची गरज ओळखून अतिरिक्त शुल्क घेण्यात येत होते. अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होत्या. या पाश्र्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकारी  सौरभ राव यांनी यंत्रचालकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी केंद्र चालकांना  आधारबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही काही केंद्र चालक, केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केले आहेत.

डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाइनच्या ३३ यंत्रचालकांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. तर, चार जणांना गैरप्रकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गैरव्यवहार आणि गैरप्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, महाऑनलाइन आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून आधार केंद्र चालकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. काळ्या यादीत टाकलेल्या केंद्रचालकांकडून कामे काढून घेण्यात येऊन त्यांच्याजागी नव्या लोकांना कामे देण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत शहर आणि जिल्ह्य़ात जिल्हा प्रशासनाकडून पंधरा खासगी केंद्रचालक आधारची कामे करत आहेत. तर, टपाल कार्यालये, महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये आणि बँकांमध्ये संबंधित संस्थांचे कर्मचारी कामे करत आहेत. तसेच काही केंद्रचालकांना विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नियुक्त केले आहे.

आधार केंद्रांवर गैरव्यवहार आणि गैरप्रकार केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत ७० केंद्रचालकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आधारची कामे काढून घेण्यात आली असून त्यांच्याजागी नव्या केंद्रचालकांना कामे देण्यात आली आहेत. आधार केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार प्रशासनाकडून खपवून घेतला जाणार नाही.

– विकास भालेराव, मुख्य आधार समन्वयक, जिल्हाधिकारी कार्यालय