महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नुकतीच एक अजब शस्त्रक्रिया करण्यात आली. एका ७० वर्षीय रुग्णाच्या पोटातून चक्क ८ इंचाचा आतड्याला पीळ बसून झालेला गोळा यशस्वीपणे काढण्यात आला. रुग्णाचे वय जास्त असूनही रुग्णालयातील डॉक्टरांना या शस्त्रक्रियेत यश आले आहे. या आजोबांचे नाव आहे बबन होळकर. आता त्यांची प्रकृती स्थिर असून काही दिवसातच त्यांना डिसचार्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

होळकर यांची अचानक तब्बेत बिघडल्याने ६ फेब्रुवारी रोजी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करताना त्यांच्या पोटात काहीतरी असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी साधारण अडीच लाख रुपये खर्च होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एवढी मोठी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न असल्याने होळकर कुटुंबाने शस्त्रक्रियेस सुरुवातीला नकार दिला. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्याचा उपाय सुचवला.

त्यानुसार बबन होळकर यांना महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने त्यांच्यावर उपचार करत शस्त्रक्रिया करण्यात आली. पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांपुढे ही शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान होते. तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया चालली.यानंतर बबन होळकर यांच्या पोटातून चक्क ८ इंचाचा गोळा काढण्यात आला. डॉ.संजय पाडाळे, हर्षल सोनवणे,आरती फुलारी,राजेश गोरे आणि डॉ.चव्हाण या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. यामुळे बबन होळकर या ७० वर्षीय आजोबांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या रुग्णालयाने दाखविलेल्या तत्पर्यामुळे लाखो रुपये खर्च करण्याची गरज होळकर कुटुंबाला पडली नाही. ऑगस्ट महिन्यात याच रुग्णालयात अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करत महिलेच्या पोटातून १५ किलोचा गोळा काढला गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.