News Flash

रामदेवराव यादवकालीन ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला

तीनशे-चारशे वर्षांपूर्वी तळेगाव ढमढेरे हा कसबा होता. त्या भागातील एक महत्त्वाचे धार्मिक, राजकीय आणि व्यापारी केंद्र होते.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथील  एका ढमढेरे घराण्याच्या ढासळलेल्या गढीच्या जागेवर खोदकाम करत असताना रामदेवराव यादवकालीन ७०५ वर्षांपूर्वीचा भव्य शिलालेख सापडला. तळेगावात ७० वर्षांपूर्वी राष्ट्रकुट राजा पहिला कृष्ण याचा इसवी सन ७६८ मधील म्हणजेच इसवी सन १२५० वर्षांपूर्वीचा ताम्रपट सापडला होता. त्यानंतर आता सापडलेल्या शिलालेखामुळे १२ व्या, १३ व्या शतकातील महाराष्ट्र आणि प्रामुख्याने पुण्याच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकता येणार आहे.

तीनशे-चारशे वर्षांपूर्वी तळेगाव ढमढेरे हा कसबा होता. त्या भागातील एक महत्त्वाचे धार्मिक, राजकीय आणि व्यापारी केंद्र होते. या गावात अनेक ऐतिहासिक घराण्यांमध्ये ढमढेरे घराण्याचा मोठा सहभाग होता. या घराण्यातील अनेक ऐतिहासिक पुरुषांनी िहदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि साम्राज्य विस्तारासाठी देशभरात घोडदौड करून शौर्य गाजविले. ढमढेरे घराण्यातील सरदारांचे तळेगावात ऐतिहासिक वाडे आणि गढी आहेत. अशाच एका ढासळलेल्या गढीच्या जागेवर खोदकाम करत असताना हा शिलालेख सापडला असल्याची माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि प्रा. डॉ. पद्माकर गोरे यांनी दिली.

बलकवडे म्हणाले, या शिलालेखावर शके १२३५ प्रभादी नामसंवत्सरे म्हणजेच इ. स. १३१३ असा काळ दिलेला आहे. लेखात रामदेवराव यादवाचा ‘प्रताप चक्रवर्ती रामचंद्र देव’ असा उल्लेख असून रामचंद्र यादवांचा महामंडलेश्वर म्हणजेच स्थानिक प्रांत अधिकारी श्री. सामळ सदू आणि स्थानिक पारनेर संघाचा कारभारी गोदाई नाईकाचा उल्लेख आलेला आहे. हा शिलालेख या परिसरात एखाद्या मंदिराच्या निर्मितीनंतर त्याच्या निर्मितीकर्त्यांने कोरलेला असून या मंदिराचे रक्षण करण्यासाठी गद्यगळ स्वरूपात लोकाज्ञा म्हणून आहे. इ.स. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीच्या रामदेवराव यादवावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. खिलजी याची स्वारी हीच दक्षिण भारतावरील पहिले इस्लामिक आक्रमण होते. रामदेवरावाच्या पराभवानंतर हळूहळू यादवांची सत्ता लयाला जाऊन संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतावर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच काळामध्ये या मंदिराचा विध्वंस झाला. त्या मंदिराच्या निर्मितीनिमित्ताने कोरलेला हा शिलालेख तत्कालीन परिस्थितीत जमिनीत गाडला गेला असावा.

या शिलालेखावरून रामदेवराव यादवाचा पराभव झाला असला तरी इ.स. १३१३ पर्यंत पुणे परिसरावर यादवांचीच सत्ता असल्याचे सिद्ध होते. पुणे प्रांतातील महामंडलेश्वर सामळ सदू याचे नाव उपलब्ध होते. तसेच त्यावेळेस पारनेर हा प्रांताच्या अंतर्गत एक संघ असून त्यावर गोदाई नाईक नावाचा कारभारी असल्याचे समजते. आजही तळेगावामध्ये लहान-मोठी ६० ते ६५ मंदिरे असून त्यापकी पाच मंदिरे प्राचीन आहेत. मराठी राज्य निर्माण झाल्यानंतर या मंदिरांचा गावच्या स्थानिक सरदारांनी जीर्णोद्धार केल्याचे दिसून येते. अनेक कर्तृत्ववान सरदारांनी नऊ मंदिरांची निर्मिती केली असून त्यावर त्यांचे शिलालेख कोरण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:32 am

Web Title: 705 years ago inscription inscription was found in ramdevra yadava
Next Stories
1 सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल – पोलीस आयुक्त के. वेंकटेशम
2 ‘पीएमपी’चा रस्त्यांत खोळंबा
3 कर्वे रस्ता परिसरातील वाहतुकीत बदल
Just Now!
X