सरत्या वर्षांला निरोप आणि नव्या वर्षांचे स्वागत करणाऱ्यांच्या जल्लोषात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ३१ डिसेंबरला संध्याकाळपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले.. ‘थर्टी फर्स्ट’ सुखरूप झाले आणि नव्या वर्षांचा पहिल दिवस उजाडला.. काही उसंत मिळते ना मिळते तोवर भीमा कोरेगावच्या ‘त्या’ हिंसाचाराची बातमी धडकली अन् त्यानंतर सलग ७२ तासांहून अधिक काळ त्यांना कर्तव्यावरच राहावे लागले.

नव्या वर्षांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत ‘थर्टी फस्ट’च्या पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. ३१ डिसेंबरला मोठय़ा प्रमाणावर तरुणाई रस्त्यावर येणार असल्याने बंदोबस्त ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस रस्त्यावर होते. ३१ डिसेंबरला मध्यरात्रीनंतर थेट पहाटेपर्यंत अनेकजण कर्तव्यावर होते. नव्या वर्षांचा पहिला दिवस काय घेऊन येणार याची कुणालाही कल्पना नव्हती. १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तेथे वाहनांची तोडफोड, दगडफेक, जाळपोळ झाल्याच्या बातम्या धडकल्याने पोलिसांच्या अतिरिक्त फौजा त्या भागात पाठविण्यात आल्या. भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद शहर, ग्रामीण भागातही उमटण्याची शक्यता असल्याने पहाटे घरी गेलेले पोलीस पुन्हा रस्त्यावर आले. भीम कोरेगाव आणि परिसरात शांततापूर्ण तणाव असला, तरी २ जानेवारीला शहरात िहसाचाराचा डोंब उसळला. अनेक ठिकाणी खासगी वाहने, बस फोडण्याचे, जाळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांबरोबर राज्य राखीव दल, गृहरक्षक दल आदींच्या तुकडय़ा तैनात केल्या. २ जानेवारीला रात्रीपर्यंत विविध भागात तोडफोडीच्या घटना सुरूच होत्या. त्यामुळे ही रात्रही बंदोबस्तावरच गेली.  दुसऱ्या दिवशी ३ जानेवारीला आंबेडकरी संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे पुन्हा सकाळपासूनच बंदोबस्ताला सुरुवात झाली. गुरुवारीही कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने संवेदनशील भागामध्ये पोलीस कार्यरत होते.