पिंपरी-चिंचवडमध्ये एका ७२ वर्षीय आजींचं क्रॉस लसीकरण करण्यात आलं असून, याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतः लक्ष देत संबंधित परिचारिकेवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. या आजींना पहिला डोस हा कोविशील्डचा देण्यात आलेला असताना, दुसरा डोस मात्र कोवॅक्सिनचा देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या आजींच्या नातेवाईकाने आजींना कोविशिल्डचा डोस द्यावा, असं अगोदर सांगितलेलं असतानाही या लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिन लस देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या या आजींना पहिला डोस हा कोविशिल्डचा देण्यात आला होता. त्यानंतर, त्यांनी दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्यावर त्यांना आलेल्या मेसेजनुसार त्यांना संत तुकाराम नगर येथील महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर नेण्यात आलं. दरम्यान, तिथं आजींनी पहिला डोस हा कोविशिल्डचा देण्यात आला आहे अशी माहिती परीचारिका यांना देण्यात येऊनही त्यांनी कोवॅक्सिनचा डोस दिला. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झाला आहे. अशी घटना इतरांबाबत घडू नये असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. तसेच, याप्रकरणी संबंधित परिचरिकेवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तर, याप्रकरणी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित परिचरिकेवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असून, आजीच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असं देखील म्हटलं आहे.