करोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा करणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहामाहीत ७८१०.२१ कोटी रुपयांची तूट आली आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी विभागाला २८ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील सहा महिन्यात विभागाला तब्बल २१ हजार ८१०.२१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करावा लागणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दरवर्षी महसूल गोळा करण्यासाठी उद्दिष्ट दिले जाते. गेल्या तीन वर्षांत विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा के ला आहे. साधारणत: पहिल्या सहामाहीत विभागाला

दिलेल्या उद्दिष्टापेक्षा निम्मे उत्पन्न प्राप्त होते. यंदा करोनामुळे लावलेली टाळेबंदी, अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या, मोठय़ा किं मतीचे नोंदवले न गेलेले व्यवहार आणि राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सूट अशा विविध कारणांमुळे विभागाला चालू आर्थिक वर्षांत उद्दिष्ट गाठताना कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षांत म्हणजेच १ एप्रिलपासून सप्टेंबपर्यंत विभागाकडे सात लाख ८३ हजार ५० दस्त नोंद झाले असून त्यापोटी ६१८९.७९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एप्रिल महिन्यात २७२.३९ कोटी, मेमध्ये ४१४.७५ कोटी, जूनमध्ये १२६०.५४ कोटी, जुलैमध्ये १३०९.९२ कोटी, ऑगस्टमध्ये १४१६.४५ कोटी आणि सप्टेंबरमध्ये १५१४.७४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जास्त दस्त नोंद झाले आहेत. ही समाधानाची बाब असून पुढील सहा महिन्यात अशीच स्थिती राहिल्यास उद्दिष्ट गाठण्यात अडचण येणार नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या तीन वर्षांतील उत्पन्न

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांत पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ११ हजार ९१८.१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांत १३ हजार ६१५.७७ कोटी, सन २०१९-२० या आर्थिक वर्षांत १४ हजार ६१५.५९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.  सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांत विभागाला २३ हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार २६ हजार ४७०.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. सन २०१८-१९ या वर्षांत २४ हजार कोटींचे उद्दिष्ट होते. त्यानुसार २८ हजार ५७९.५९ कोटींचे उत्पन्न मिळाले. सन २०१९-२० या वर्षांत २८ हजार कोटींचे उद्दिष्ट होते. त्यानुसार २८ हजार ९८९.२९ कोटींचे उत्पन्न मिळाले. तर, २०२०-२१ या वर्षांसाठी देखील २८ हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत ६१८९.७९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.