शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना थांबविण्यासाठी पुणे पोलिसांकडून कितीही प्रयत्न केले तरी त्या थांबविण्यात अपयशच आले आहे. सोनसाखळी चोरांपुढे पोलीस हतबल झाल्याचे चित्र दिसत असून गेल्या दोन दिवसात शहरात आठ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये सहा लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.
सोनसाखळी चोरटय़ांनी महिलांचे दागिने हिसकावण्याचा सपाटच सुरू ठेवला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. दुचाकीस्वारांची तपासणी सुरू आहे. पोलीस ठाण्यांना आयुक्तांनी मनुष्यबळ वाढवून दिले आहे. शिवाय सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात गस्त घालण्याच्या सूचनाही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तरीही मंगळवारी दिवसभर कोथरूड, हिंजवडी आणि सांगवी येथे सोनसाखळी चोरीची घटना घडली. त्या तीन घटनांमध्ये ७० पेक्षा जास्त वयाच्या महिलांना लक्ष्य केले गेले. त्याचबरोबर बुधवारी सकाळी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, सहकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा पाच घटना घडल्या.
याबाबत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी सर्व उपाय केले जात आहेत. पोलीस ठाण्यांना मनुष्यबळ वाढवून दिले आहे. वाहतूक, विशेष शाखेमधील पोलीस कर्मचाऱ्यांची साखळी चोरी थांबविण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या रस्त्यांना अंतर्गत उपरस्ते असल्यामुळे त्याचा फायदा साखळीचोर घेतात. दुचाकीवर दोन तरुण असणाऱ्यांची तपासणी करून गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 ‘महिलांनो मिरची पूड बाळगा’
सोनसाखळी चोर हे पाहणी करून कोठे पोलीस नाहीत, त्या ठिकाणीच सोनसाखळी चोरी करतात. त्यामुळे महिलांनी स्वत:जवळ मिरची पूड बाळगावी. त्याचबरोबर सोनसाखळी चोरी होत असताना आरडा-ओरडा करून मदत मागावी, असे आवाहन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी महिलांना केले. ज्या भागात जास्त सोनसाखळी चोरीच्या घटना होतात, त्या ठिकाणी महिला पोलीसांना सापळा रचण्यासही सांगितले आहे.
 ‘ठाण्यात येताना-जाताना गणवेश घाला’
पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले की पोलीस कर्मचारी गणवेशावर दुसरा शर्ट घालून बाहेर पडतात. रस्त्यावर पोलीस अधिक प्रमाणात दिसले तरी काही गुन्हे कमी होतील, या दृष्टिकोनातून आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना येताना आणि जाताना गणवेश घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.