पुणे शहरात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे १३ जुलै पासून शहरात पुन्हा कडक लॉकडाउन घेतला आहे. पुण्यात आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज, रविवारी पुण्यात अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा शहरातील मृत्यूमध्ये या करोनाबाधित रुग्णांचे वय कमी होते.

शनिवारी पुण्यात ८२७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, १६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. पुणे शहरातली करोना रुग्णांची संख्या आता २६ हजार ९०४ वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान करोनावर उपाचर घेणाऱ्या ८०८ रुग्णांची तब्येत ठणठणीत झाल्याने, त्यांना घरी पाठवण्यात आले. आजपर्यंत १६ हजार ९९६ जणांनी करोनावर मात केली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात उद्यापासून लॉकडाउन 

पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै या काळात संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. पहिले पाच दिवस या भागात कठोर टाळेबंदी असेल. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण तसेच औषधे दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही या काळात सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे, कल्याण डोंबिवली शहरांमध्ये १९ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा-भाईंदर येथे आणखी नऊ दिवस टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.