पिंपरी महापालिकेच्या वतीने मोशीत जर्मनी येथील कंपनीच्या माध्यमातून ‘कचरा ते वीज’ असा महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे दररोज ५०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून ८ ते १० मेगाव्ॉट वीजनिर्मितीही होणार आहे.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने संयुक्तपणे उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नुकतेच अॅटो क्लस्टर येथे मिशेलिस कंपनीद्वारे सादरीकरण करण्यात आले. तेव्हा कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे सुटेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला होता. आयुक्त राजीव जाधव यांनी गुरुवारी या जागेची पाहणी केली.
जर्मनीतील तंत्रज्ञानाच्या आधारे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च कंपनी करणार असून महापालिकेला जागा द्यावी लागणार आहे. ‘बांधा आणि चालवा’ या तत्त्वावर कंपनी हा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची गरज नाही. प्रकल्पाच्या माध्यमातून प्रदूषण होणार नसल्याने नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. या प्रकल्पामुळे शहरातील कचरा प्रश्न निकालात निघणार आहे. कचरा डेपो परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही सुटेल. महापालिका आणि राज्य शासन सकारात्मक असून लवकरच जागतिक निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मोशी कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. नरक यातनेतून सुटका करा, असे गाऱ्हाणे ते सातत्याने मांडत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडला, तेव्हा त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आता लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल.
– महेश लांडगे, स्थानिक आमदार