सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी लागली आहे. त्यामुळे अनेक मुले घराबाहेर किंवा घरात खेळत असतात, अशात खेळता खेळता एका मुलाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना निगडीत घडली आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. इलॅस्टिकशी खेळता खेळता गळफास लागून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नकुल कुलकर्णी असे या ८ वर्षांच्या मुलाचे नाव आहे. सिद्धीविनायक नगर भागात तो राहात होता.
सोमवारी दुपारी नकुल आपल्या घरात खेळत होता. दुपारच्या वेळी त्याचे आजी आणि आजोबा हॉलमध्ये बसले होते. नकुल आतल्या खोलीत खुंटीला अडकवलेल्या इलॅस्टिकशी खेळत होता. खेळता खेळता त्याचा गळा इलॅस्टिकमध्ये अडकला. त्याला त्या इलॅस्टिकचा फास लागला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ नकुल बाहेर आला नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. आतून काहीही प्रतिसाद आला नाही म्हणून दार तोडून आत प्रवेश केला असता नकुलला फास लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. या प्रकरणाचा तपास आता देहू रोड पोलीस करत आहेत.
येत्या काही दिवसांत नकुलची मुंज होणार होती. त्याच्या मुंजीचे निमंत्रण देण्यासाठी त्याचे आई वडिल बाहेर गेले होते. मात्र घरी आले तेव्हा हा सगळा प्रकार घडला होता. या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 7:42 pm