21 March 2019

News Flash

धक्कादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये मंदिरात ८ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

आरोपी पीडित मुलीला आपण मंदिराच्या पाठीमागे खेळू असे म्हणत मंदिरात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.

(संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी येथे भागवत गीता मंदिरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा निदर्शनास आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहन भांडेकर (वय १८, रा. खराळवाडी) असे आरोपीचे नाव असून तो या भागवत गीता मंदिराच्या जवळच राहतो. शनिवारी सकाळी पीडित मुलगी मंदिराच्या समोर एकटीच खेळत होती. यावेळी आरोपी त्याठिकाणी आला आणि आपण मंदिराच्या पाठीमागे खेळू असे म्हणत तिला मंदिरात घेऊ गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला व आजीला दिली. त्यानुसार त्यांनी पिंपरी पोलिस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. रविवारी आरोपी रोहन याला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीची आई ही धुणे-भांड्याचे काम करते तर तिचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. शनिवारी घटना घडली तेव्हा दोघेही बाहेर कामावर होते तर आजी घरात होती.

आरोपी रोहण भांडेकर आणि त्याची आई हे भागवत गीता मंदिराची साफ सफाईचे काम करतात. मात्र, त्या दिवशी आरोपीची आई नव्हती आणि सकाळीच मंदिराच्या परिसराची स्वछता केली होती. मात्र, या घटनेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला गजाआड करून न्यायालयात हजर केले त्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

First Published on June 13, 2018 4:45 pm

Web Title: 8 years old girl raped in temple at pimpri chinchwad