राज्यभरात धावणाऱ्या ऐंशी टक्क्य़ांहून अधिक खासगी प्रवासी बसला आपत्कालीन दरवाजे नसल्याची बाब समोर आली आहे. ‘स्लीपर कोच’ प्रकारातील बसला असे दरवाजे असले, तरी झोपण्याच्या ‘बर्थ’मुळे त्याचा उपयोग होत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशाचा जीव धोक्यात घालून या बसमधून प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार निरीक्षकही बेकायदेशीरपणे होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून अशा बसला वाहतुकीसाठी परवानगी देत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे-नागपूर खासगी प्रवासी बसला गुरुवारी वर्धा येथे लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आपत्कालीन दरवाजे नसल्याने संकटाच्या प्रसंगी अशा बसमधून प्रवासी तातडीने बाहेर निघू शकत नाहीत. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही बसला उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असणे बंधनकारक आहे. बसमधील प्रवासी आत्पत्कालीन स्थितीत योग्य प्रकारे बसच्या बाहेर पडला पाहिजे, अशी या दरवाजाची रचना असावी लागते. मात्र, राज्यात हजारो बस आपत्कालीन दरवाजाविनाच प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले आहे.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी याबाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून बसला वाहतुकीसाठी परवानगी दिली जाते. आपत्कालीन दरवाजा नसेल, तर बसला परवानगी मिळूच शकत नाही. मात्र, तरीही अशा हजारो बस आजही रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे या प्रकरणात ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याचे स्पष्ट आहे. प्रवाशांना वेळीच बाहेर पडता न आल्याने त्यांचा जीव जाण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पण, त्याकडे आजवर गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.

*‘स्लीपर कोच’ प्रकारातील प्रवासी बसमध्ये खालच्या व वरच्या बाजूला झोपण्यासाठी बर्थ तयार केले जातात. त्यामुळे आपत्कालीन दरवाजे असूनही उपयोग होत नाही.
*दरवाजाजवळील बर्थ काढल्यास काही आसने कमी करावी लागत असल्याने खासगी वाहतूकदार आपत्कालीन दरवाजे ठेवत नसल्याचे दिसून येते.
*लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याच्या या प्रकाराबाबत सामूहिक न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी श्रीकांत कर्वे यांनी केली आहे.  
*या प्रकरणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९०११०३४८८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.