उतारवयात पती-पत्नी एकमेकांना आधार असतात. मात्र, पुण्यात एका ८० वर्षाच्या व्यक्तीने घटस्फोटासाठी दावा केला आहे. ५५ वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघांच्या नात्यात कटुता आली. पत्नीकडून सतत होणारा मानसिक छळ, आरोग्याकडे तिचे होणारे दुर्लक्ष आणि तिने फसवून ताब्यात घेतलेली सर्व संपत्ती, अशा सर्वच त्रासाला कंटाळून पुण्यातील वयोवृद्ध व्यक्तीने घटस्फोटासाठी पुण्यातील कौटंबिक कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

या दोघांचे जून १९६४ मध्ये लग्न झाले आहे. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. या दोघांनी मिळून एक संस्था सुरू केली होती. त्या संस्थेच्या पत्नी अध्यक्ष आहे; तर पती संचालक आहेत. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा द्यावा; तसेच संस्थेतून आणि घरातून निघून जावे म्हणून पत्नीकडून त्यांना गेली अनेक वर्षे वारंवार त्रास दिला जातो आहे.

अर्जदार पतीने अॅड. वैशाली चांदणे यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ चे कलम १३ (१) (आयए) नुसार घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला आहे. पत्नीला दुर्धर आजार झाला, तेव्हा पतीने तिची खूप काळजी घेतली. तिचा आजार पूर्णपणे बरा झाला. तिच्या आजारपणात तिची सर्वतोपरी काळजी घेतली होती. पत्नीकडून होणारा छळही त्यांनी प्रेमापोटी सहन केला.