देशभरातील लष्कराच्या ४६ रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठीचा नियोजनबद्ध प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यासाठी ८ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मंगळवारी सांगितले.
कोंढवा रस्त्यावरील कमांड हॉस्पिटलच्या नव्या इमारतीची पायाभरणी अँटनी यांच्या हस्ते करण्यात आली. लष्करप्रमुख जनरल विक्रम सिंग, नौदलप्रमुख आणि लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक एअर मार्शल डी. पी. जोशी, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, कमांड हॉस्पिटलचे कमांडंट मेजर जनरल व्ही. रविशंकर या प्रसंगी उपस्थित होते.
सैन्यदलाच्या कल्याणाप्रती सरकार वचनबद्ध असून पुण्यात नव्याने उभारण्यात येणारे कमांड हॉस्पिटल वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून अँटनी म्हणाले, देशभरातील लष्करी रुग्णालयांमध्ये अत्युच्च प्रतीची वैद्यकीय सेवा मिळण्याच्या उद्देशातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुणे आणि बंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलचे नूतनीकरण करण्यात येणार असून कोचीन आणि विशाखापट्टणम येथील हॉस्पिटलचा पुढील टप्प्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. अद्ययावत ज्ञान संपादनाची प्रक्रिया सुरू राहावी यासाठी डॉक्टर, सर्जन, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचारी यांचे निरंतन प्रशिक्षण, पायाभूत सुविधांची पूर्तता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार हे वैशिष्टय़ असेल. दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल सध्या मोठे रुग्णालय आहे. मात्र, नूतनीकरणानंतर पुण्याचे कमांड हॉस्पिटल हे आशियातील सर्वात आधुनिक आणि १०४७ रुग्णांची क्षमता असलेले मोठे रुग्णालय ठरेल.
जनरल विक्रम सिंग म्हणाले, प्रस्तावित रुग्णालय सहा मजली असून त्यासाठी ३८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एक हजारांहून अधिक रुग्णांवर उपचाराची क्षमता असलेल्या या नव्या इमारतीमध्ये प्रसूतिशास्त्र, स्त्रीरोग उपचार, रोगनिदान शास्त्र संस्था, मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र, मेदू विज्ञान, अद्ययावत नेत्र उपचार केंद्र, क्रीडा वैद्यक शास्त्र, नवजात शिशू आणि बालआरोग्य केंद्र असे विविध विभाग असतील. डिसेंबर २०१६ पर्यंत हे रुग्णालय कार्यरत होईल.