दिवसागणिक करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंताजनक वातावरण होतं. अशा नकारात्मक वातावरणात ८१ वर्षीय आजोबांनी करोनावर मात करत पुणेकरांना सकारात्मक संदेश दिलाय.

पुण्यातील दोन करोना बाधित रुग्णांवर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून ८१ वर्षीय नागरिक आणि ३० वर्षीय तरुण ठणठणीत बरे झाले आहेत. वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ राजेंद्र वाबळे व मेडिसीन विभागाचे प्रमुख डाॅ प्रविण सोनी यांचे मार्गदर्शनाखालील पथकाने करोना बाधित रूग्णांवर उपचार केले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असणाऱ्या करोना बाधित रूग्णांवर डाॅक्टर्सच्या अथक परिश्रमाला यश आले असून ८१ वर्षाच्या रूग्णासह ३० वर्षाच्या तरुणाला आज डीस्चार्ज देण्यात आला. दोन्ही रूग्णांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि परिश्रमाने रूग्णांना बरे करण्यात यश आले आहे. १४ दिवस रूग्णालयात उपचार केल्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून सोडल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील रहिवासी होते. रुग्णांना घरी सोडतांना निरोप देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे, डॉ प्रविण सोनी, डॉ किशोर खिल्लारे, डॉ अनिकेत लाठी, डॉ स्मिता पानसे, डॉ कौस्तुभ कहाने, डॉ अभयचंद्र दादेवार. डॉ अक्षय शेवाळे, डॉ वालिद , परिचारिका श्रीमती सुर्वे ,श्रीमती संगीता पाटील आदि उपस्थित होते.