पुणे : टाळेबंदी काळात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) पुणे विभागाच्या ८३ टक्के ग्राहकांकडून दूरध्वनी, मोबाइल यांची देयके (बिले) ऑनलाइन भरणा करण्यात आली आहेत. टाळेबंदीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बीएसएनएलकडून येत्या २७ एप्रिलपर्यंत देयक भरले नाही, तरीही अखंड सेवा दिली जाणार आहे. असे असतानाही एवढय़ा प्रमाणात देयकांचा भरणा झाल्याने  ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास दृढ असल्याची भावना बीएसएनएल पुणे विभागाचे महाव्यवस्थापक संदीप सावरकर यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात टाळेबंदी लागू केल्यानंतर बीएसएनएलकडून दूरध्वनी, आंतरमहाजाल आणि मोबाइल सेवा अखंडपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सेवा देण्यात विलंब होत आहे. करोनाबाबत राज्य नियंत्रण कक्ष, पोलीस यंत्रणांचे संपर्क क्रमांक, रुग्णालये, रुग्णवाहिका, स्थानिक प्रशासन यांच्याकडून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले संपर्क क्रमांक बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी कायम सुरू ठेवण्यात आले आहेत.

बीएसएनएलच्या ग्राहकांना आपली देयके http://www.bsnl.co.in  या संकेतस्थळावर वा अ‍ॅमेझॉन पे, पेटीएम व अशा प्रकारच्या विविध अ‍ॅपद्वारेही भरण्याची सुविधा आहे. याबरोबरच लवकरच बीएसएनएलच्या मोबाइलचा रिचार्ज आणि देयके भरण्याची सुविधा टपाल कार्यालयांतूनही सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक विकलांग असलेल्या ग्राहकांनी  देयके ऑनलाइन पद्धतीनेच भरावीत. जगभरातून कोणत्याही व्यक्तीने ऑनलाइन देयक भरल्यास ती स्वीकारली जात आहेत. थकलेल्या देयकांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही, मात्र देयक थकले म्हणून संबंधित सेवा येत्या २७ एप्रिलपर्यंत खंडित करण्यात येणार नाही, असेही सावरकर यांनी स्पष्ट केले. बीएसएनएल ही सरकारची धोरणात्मक मालमत्ता असल्याने त्यानुसार बीएसएनएलचे अधिकारी, कर्मचारी टाळेबंदीत कार्यरत आहेत. धनादेशाद्वारे देयके द्यायची असल्यास बीएसएनएलच्या ग्राहक सेवा केंद्रांत व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्राहकांचा प्रतिसाद

सद्य:स्थितीत पुणे विभागामध्ये एक लाख ८७ हजार ४३० दूरध्वनी जोडण्या (लॅण्डलाइन) आणि ३८ हजार २५४ पोस्टपेड मोबाइल जोडण्या  आहेत. तर, सहा लाख १२ हजार ४५३ एवढे प्रिपेड ग्राहक आहेत. या ग्राहकांमधील तब्बल ८३ टक्के ग्राहकांनी टाळेबंदी काळात आपल्या ऑनलाइन देयकांचा भरणा केला आहे, अशी माहिती बीएसएनएल पुणेचे महाव्यवस्थापक संदीप सावरकर यांनी दिली.