27 May 2020

News Flash

कृत्रिम श्वासोच्छ्वासामुळे ८५ टक्के रुग्णांना नवजीवन

समज-गैरसमजांना थारा न देण्याचे  डॉ. प्राची साठे आवाहन

(संग्रहित छायाचित्र)

समज-गैरसमजांना थारा न देण्याचे  डॉ. प्राची साठे आवाहन

पुणे : रुग्णाला व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसनयंत्रणा) ठेवले म्हणजे रुग्ण शेवटच्या घटका मोजत आहे, व्हेंटिलेटर रुग्णाचा मृत्यू लांबणीवर टाकण्यासाठी आहे किंवा व्हेंटिलेटर लावलेला रुग्ण वाचण्याची शक्यताच नाही, अशा गैरसमजांमुळे नागरिकांमध्ये व्हेंटिलेटरबाबत भीती असते. प्रत्यक्षात व्हेंटिलेटरवर ठेवलेले ८५ टक्के रुग्ण ठणठणीत बरे होतात, असे मत ज्येष्ठ अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. प्राची साठे यांनी व्यक्त केले.

करोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत आरोग्य यंत्रणा मोठय़ा प्रमाणावर व्हेंटिलेटर मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांची उपयुक्तता विचारात घेऊनच, त्यामुळे नागरिकांनी त्याबाबत गैरसमजांना थारा देऊ नये, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकच्या अति दक्षता विभाग प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी केले आहे.

डॉ. साठे म्हणाल्या, एकदा व्हेंटिलेटर लावले की रुग्ण जगत नाही, असा एक समज नागरिकांमध्ये रुढ आहे. मात्र, प्रत्यक्षात अगदी दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर ठेवलेले ७५ ते ८५ टक्के रुग्ण पूर्ण बरे होऊन पूर्वीप्रमाणेच चांगले आयुष्य जगू शकतात. शरीर एखाद्या आजाराशी झगडत असते त्यावेळी फुप्फुस आणि हृदयाला जास्त आधाराची गरज असते.

या काळात अनेक जटिल क्रिया शरीरात घडत असतात. त्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी व्हेंटिलेटरचा उपयोग होतो. रुग्णाचा मृत्यू लांबवण्यासाठी व्हेंटिलेटर वापरले जाते असाही एक गैरसमज दिसतो. प्रत्यक्षात, मूळ आजार बरा होणारा आहे की उपचारांना प्रतिसाद न देणारा आहे यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात. योग्य वेळी व्हेंटिलेटरचा वापर करणे शक्य झाले, तर रुग्ण पूर्ण बरा होणे शक्य असते.

करोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांमध्ये फुप्फुसांची अवस्था नाजूक होते, त्यामुळे काळजीपूर्वक व्हेंटिलेटर उपचार करावे लागतात, त्यादृष्टीने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ही देत आहोत.

जीवन आणि मृत्यूच्या सीमेवर असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर कधी आणि कसे लावावे याबाबत काही वैज्ञानिक ठोकताळ्यांचा आधार घेणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतरच रुग्णाचे नातेवाईक आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्याशी सल्ला मसलत करुनच व्हेंटिलेटर लावण्याचा निर्णय होतो.

यंत्र आणि मानवाचा समन्वय

रुग्णाला व्हेंटिलेटर लावल्यानंतर डॉक्टर, परिचारिका, तज्ज्ञ यांची संपूर्ण फौज त्या रुग्णावर देखरेख करते. किती प्रमाणात ऑक्सिजन द्यायचा, प्रत्येक मिनिटाला किती श्वास घेतला जावा, शरीरातून कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर काढावा, फुप्फुसे किती ताण सह करु शकतील या सर्व बाबींचे नियमन करण्यासाठी हे तज्ज्ञ काम करतात. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या रुग्णाकडे डॉक्टर पाहत नाहीत, हाही एक गैरसमजच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 1:16 am

Web Title: 85 percent of patients cured by ventilator zws 70
Next Stories
1 रोह्य़ातील ज्येष्ठ महिलेला पुण्यातून तातडीने औषधे
2 संसर्ग टाळण्यासाठी ‘फेस शिल्ड
3 कळवा, मुंब्रा, दिवा आणि पुण्यातील काही भागांना पूर्ण टाळे
Just Now!
X