पुणे रेल्वे स्थानकावरून ७ वाजून १५ मिनिटांच्या ठोक्याला सुटणाऱ्या डेक्कन क्वीनला आज ८८ वर्षे पूर्ण होत आहे. डेक्कन क्वीन ही दख्खनची राणी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या रेल्वेच्या सर्व डब्ब्यांना फुगे लावून आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रवाशांची ही लाडकी डेक्कन क्वीन मुंबईकडे मार्गस्थ झाली.

या कार्यक्रमापूर्वी डेक्कन क्वीनने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या आवडत्या क्वीनला मार्गस्थ करण्यासाठी केक घेऊन उपस्थिती लावली. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना केक दिला जात होता. रोज आपल्यासाठी पुणे ते मुंबई सुखरूपपणे घेऊन जाणाऱ्या या क्वीनचा वाढदिवस साजरा करताना प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. चाकरमान्यांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचा हा वाढदिवस साजरा करतानाचा क्षण टिपण्यासाठी अनेक प्रवासी सेल्फी काढण्यात मग्न झाले होते.

१ जुन १९३० रोजी ही रेल्वे पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही रेल्वे कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर आताच्या सीएसटीपर्यंत ती धावायला लागली. डेक्कन क्वीन ही त्याकाळातील अाशियातील सर्वात वेगवान रेल्वे होती. या गाडीला एकूण १७ डब्बे आहेत. त्यापैकी एक डब्बा महिलांसाठी राखीव, दोन वातानुकूलित, यातील काही डबे पास धारकांसाठी राखीव आहेत. पास धारकांसाठी ही गाडी अपवादात्मक आहे. १२० कि.मी पुढे गाडी जात असेल तर त्यासाठी पास देण्यात येत नाही. मात्र, डेक्कन क्वीनला यातून वगळण्यात आले आहे. महिलांसाठी पहिल्यांदा या रेल्वेमध्ये आरक्षित डब्बा ठेवण्यात आला. तसेच देशातील पहिली विद्युतीकरणावर चालणारी रेल्वे आणि आयएसओ क्रमांक मिळवणारी रेल्वे ठरली आहे.

deccan-queen-mumbai-pune

या कार्यक्रमादरम्यान महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमाळकर, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, माजी आमदार मोहन जोशी आणि डेक्कन क्वीनचे दैनंदिन प्रवासी उपस्थित होते.

यावेळी महापौर टिळक म्हणाल्या की, या डेक्कन क्वीनमुळे पुणे ते मुंबई हा प्रवास अधिक सुखकर आणि जवळचा झाला असून गेली ८७ वर्ष लाखो प्रवाशांना सुखरूप घेऊन जात आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो.

deccan-queen-mumbai-pune-1

पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमरकर म्हणाले की, डेक्कन क्वीनने मी कॉलेजच्या जीवनात अनेक वेळा प्रवास केला. त्या प्रवासात अनेक आठवणी असून त्यात प्रामुख्याने अनेक लोकांशी नाते देखील जोडले गेले आहे. या डेक्कन क्वीनचा कधी ही प्रवास विसरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, मी वयाच्या ५ व्या वर्षापासून डेक्कन क्वीनने प्रवास करते. आता माझे वय ६३ असून चांगल्या वाईट गोष्टींची साक्षीदार आहे. या प्रवासातून अनेक नागरिकांशी नाती जोडली गेली आहे. या डेक्कन क्वीनने मुंबई आणि पुण्याला जवळ आणले आहे. यापुढेही अशीच सेवा देत राहो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

deccan-queen-mumbai-pune-2