घरात केलेले पेस्ट कंट्रोल पुण्यातील एका मुलाच्या जीवावर बेतले आहे. सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर येथे राहणाऱ्या सार्थक संदिप डोंगरे या ९ वर्षांच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सार्थकला पेस्ट कंट्रोलमुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला आणि हा त्रास वाढल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. घरामध्ये औषध फवारणी केल्यानंतर हे कुटुंबिय घरी आले. सार्थक याचा वाढदिवस असल्याने आई-वडिल, सार्थक आणि त्याचा भाऊ साहिल यांनी एकत्र जेवण केले. मात्र जेवण करुन काही तास होत नाहीत तोवर फवारलेल्या औषधामुळे सर्वाना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात उपचारादरम्यान ९ वर्षाच्या सार्थकचा दुर्दैवी अंत झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे यांनी घरात औषध फवारणी केली होती. मग सर्व जण एकत्र येत सार्थक याचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर घरातील सर्वानी जेवण केले. मात्र काही वेळाने घरातील सर्वाना उलट्या आणि जुलाब याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर डोंगरे कुटुंबातील सर्वांना शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यातच सार्थक याचा मृत्यू झाला. तर संदिप डोंगरे, त्यांच्या पत्नी आणि मोठा मुलगा साहिल यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.