डोंबिवली साहित्य संमेलनाच्या दोन निमंत्रण पत्रिका

डोंबिवली येथे होत असलेल्या आगामी ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत नेत्यांच्या नावातील क्रमवारीमुळे आयत्यावेळी मानापमान घडू नये, यासाठी आयोजकांनी चक्क दोन निमंत्रण पत्रिका काढण्याची ‘साहित्यिक कारागिरी’ करून दाखविली आहे.  संमेलनाच्या पहिल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नाव नव्या निमंत्रण पत्रिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर आले आहे. तर, संमेलनाच्या समारोप कार्यक्रमामध्ये पहिल्या पत्रिकेमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष असा उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख नव्या पत्रिकेमध्ये सुधारणा करून पक्षप्रमुख असा करण्यात आला आहे.

आगरी युथ फोरम या आयोजक संस्थेतर्फे डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये साकारण्यात आलेल्या पु. भा. भावे साहित्यनगरी येथे शुकवारपासून (३ फेब्रुवारी) तीन दिवस साहित्य

संमेलन भरणार आहे. या संमेलनाच्या यापूर्वी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नेत्यांच्या नामोल्लेखाची क्रमवारी चुकल्याचे ध्यानात आले. त्यामुळे नेत्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ संमेलनाच्या आयोजकांवर आली. आधी छापून रवाना करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिका रद्दबातल करण्यात आल्या. घाईघाईने पुन्हा नव्याने संमेलनाची निमंत्रण पत्रिका छापण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या नव्या निमंत्रण पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.

नेतेनामाची काळजी

संमेलनाच्या पहिल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना अग्रस्थान देण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आणि ज्येष्ठ हिंदूी कवी विष्णू खरे यांचे नाव होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाचवे स्थान देण्यात आले होते. नव्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ही चूक सुधारून संमेलनासाठी २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य़ करणाऱ्या राज्य शासनाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर दुसरे नाव शरद पवार यांचे आहे. त्यापाठोपाठ नूतन संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे आणि विष्णू खरे यांचा नामनिर्देश आहे. त्यामुळे मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे पाचव्या स्थानी पोहोचले आहेत.

यासंदर्भात संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नक्की काय झाले : आगरी युथ फोरम या आयोजक संस्थेतर्फे डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये  शुकवारपासून (३ फेब्रुवारी) तीन दिवस साहित्य संमेलन भरणार आहे.या संमेलनाच्या यापूर्वी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नेत्यांच्या नामोल्लेखाची क्रमवारी चुकल्याचे ध्यानात आले. त्यामुळे नेत्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ संमेलनाच्या आयोजकांवर आली.