पुणे : ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ समूहाची ९०४ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, विमा योजना, गुंतवणूक आणि बँकांतील रोख ठेवींचा समावेश आहे. ठेवीदारांकडून घेतलेला पैसा मोठय़ा प्रमाणावर चंगळ करण्यासाठी  खर्र्च झाल्याचा निष्कर्ष ‘ईडी’च्या तपासातून पुढे आला आहे.

ठेवीदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कुलकर्णी यांच्यासह समूहाशी संबंधित इतरांना अटक केल्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘ईडी’कडूनही या प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमध्ये समूहाचे विविध व्यवहार आणि मालमत्तांचा तपास करून त्याची जप्ती करण्यात आली आहे. डीएसके समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी या त्रिकुटाने इतरांच्या मदतीने विविध ठेवी जमवून सुमारे ३५ हजार ठेवीदारांच्या ११२९ कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

‘डीएसके’ नावाने वेगवेगळ्या आठ भागीदार संस्था उघडण्यात आल्या. त्या ‘डीएसके’ लिमिटेडचाच भाग असल्याचे भासविण्यात आले. त्याद्वारे २०१६ ते २०१७ या कालावधीत जवळपास तीन हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या. ठेवीची रक्कम प्रथम हेमंती कुलकर्णी यांच्या खात्यात जमा केली जात होती. तेथून ती   इतर कंपन्या आणि डी. एस. कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी आणि इतर नातलगांच्या कंपन्यांमध्ये वर्ग केली जात होती. ठेवींची रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने ती आपापसात फिरविण्यात आली. त्याद्वारे पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कर्नाटक, तामिळनाडू येथे मालमत्ता खरेदी करण्यात आली. ठेवीदारांच्याच पैशाच्या वापरातून अमेरिकेत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता खरेदी करण्यात आली. मोठय़ा रकमा विमा योजना खरेदी आणि चंगळ करण्यासाठी खर्च करण्यात आल्याचेही ‘ईडी’ने म्हटले आहे. पुण्यात फुरसुंगी येथे ३३२ कोटी रुपयांची जमीन ‘डीएसकेडीएल’ या कंपनीच्या नावे खरेदी करून मूळ जमीनधारकांना १४७ कोटी रुपये देण्यात आले. उर्वरित १८५ कोटी हडप करून हेमंती कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे वर्ग केल्याचेही तपासात पुढे आले असून, याबाबत तपास सुरू असल्याचे ‘ईडी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.