पुणे : जगभरात महिला दिनाची धामधूम सुरू असताना पुण्यातील मुलींच्या जन्मदरात वर्षभरात चिंताजनक घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत असून २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे २३ ने कमी झाला आहे.

मुलींच्या जन्मदरासंबंधीची माहिती सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारामध्ये पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागितली होती. त्यांना देण्यात आलेल्या माहितीमधून ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे. पुण्यासारख्या प्रागतिक शहरातील ही आकडेवारी चिंताजनक असून यामध्ये लक्ष घालावे, अशी  विनंती वेलणकर यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुण्यातील मुले आणि मुली यांच्या २०१६ ते २०१९ या कालावधीतील जन्मदराबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार २०१६ मध्ये हजारी ९३२ असणारा मुलींचा जन्मदर २०१७ मध्ये ९२६ झाला. त्यानंतर २०१८ मध्ये तो ९२७ झाला. त्यानंतर एका वर्षांतच म्हणजे २०१९ मध्ये मुलींचा जन्मदर ९०४ पर्यंत खाली घसरला आहे.

यासंदर्भात  पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याखाली कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अवैध गर्भपात केंद्रांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरात मुलींच्या जन्मदरात अचानक झालेली ही  घट पाहता महापालिका आरोग्य विभागाच्या गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात यावरील कारवाईमध्ये शैथिल्य आले आहे का याची चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

 

वर्ष         मुलांची                 मुलींची                  एकूण          मुले-मुली

जन्मसंख्या         जन्मसंख्या                              गुणोत्तर

२०१६      २९,०२१                २७,०५६                 ५६,०७७             ९३२

२०१७   २८,३७८                   २६,२९१                ५४,६६९              ९२६

२०१८   २८,८१५                     २६,७०१               ५५,५१६             ९२७

२०१९   २३,६३०                      २१३६०                ४४९९०              ९०४

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा शहरामध्ये कडकपणे राबविला जातो. मात्र, ग्रामीण भागातील अनधिकृत गर्भपात केंद्रांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना केवळ कागदपत्रांच्या पूर्ततेकडे लक्ष दिले जाते. त्याऐवजी ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याची आवश्यकता आहे.

– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, प्रसूतिरोगतज्ज्ञ

ही आकडेवारी खासगी रुग्णालयांकडून महापालिकेकडे नोंद झालेल्या जन्माची आहे. ही आकडेवारी कोणी दिली याची कल्पना नाही. मुले-मुली गुणोत्तराचे हे एक परिमाण असले तरी तेच एकमेव परिमाण नाही. अन्य परिमाणांसह अभ्यास करून लवकरच खरी आकडेवारी जाहीर केली जाईल.

– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका