जातपंचायतीकडून घटस्फोट न घेतल्याने गोंधळी कुटुंबाला बहिष्कृत केल्याची घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पीडित कुटुंबाने वाकड पोलिसात धाव घेतली असून १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिष्कृत केल्याने चुलत भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराला अवघी १० माणसं उपस्थित होती. या सर्व वेदना असह्य झाल्याने या प्रकरणी सीताराम कृष्णा सागरे यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी १४ पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (यांना पाटील असे संबोधले जाते), तर, मोहन शामराव उगाडे, मनोज सागरे, विजय सागरे, रागदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णू वाघमारे, अमृत भोरे, गोविंद वाघमारे अशी या सर्वांची नावं असून त्यांच्यावर वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीताराम सागरे यांनी कौटुंबिक वादातून पत्नीला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी न्यायालयात धाव घेत घटस्फोटाचा दावा दाखल केला. परंतु, याचाच राग मनात धरून आपण गोंधळी समाजाचे असून जात पंचायतकडे घटस्फोट मागायला हवा होता असे म्हणून पंच आणि पाटील यांनी फिर्यादी यांना गोंधळी समाजातून वाळीत टाकत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा फतवा काढला. काही दिवसांनी फिर्यादी यांच्या चुलत भावाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंतविधीला अवघी १० माणसं उपस्थित होती. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर होत चालले असल्याने फिर्यादी सीताराम यांनी वाकड पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे.