पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एक शेतकऱ्याच्या शेतात तब्बल २२ फुटांचा ऊस आला असून यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. इतर उसाच्या तुलनेत हा ऊस तब्बल सहा फुटांनी उंच असून दुसऱ्या तोडणीचा आहे. संदीप निवृत्ती हिंगे असं या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी ऊसाची जोपासना करण्यासाठी रासायनिक खतांसह ऊसाच्या पाचटापासून पाच टन खत निर्मिती करून त्याचा आपल्या शेतासाठी वापर केला. याचा हिंगे यांच्या उसशेतीला खूप फायदा झाला.

पुणे जिल्ह्यातील संदीप निवृत्ती हिंगे यांनी आपल्या एक एकर शेतात ऊसाची लागवड केली असून दुसऱ्या तोडणीला त्यांना सव्वा दोन लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या शेतातील ऊसाची उंची तब्बल २२ फूट असून ५० ते ५६ कांड्याचा ऊस असल्याचं ते आवर्जून सांगतात. विशेष बाब म्हणजे पहिल्या तोडणी ऐवजी दुसऱ्या तोडणीला चांगल्या प्रतीचे उत्पन्न निघत आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना हिंगे म्हणाले, “नियमित लागवड केलेल्या ऊसामध्ये आणि या ऊसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. विशेष म्हणजे नियोजनबद्ध ऊसाची शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते.” एक एकरमध्ये त्यांनी अगोदर अडीच लाखांचे उत्पन्न घेतले. या पिकातून तयार झालेली पाचट न जाळता हिंगे यांनी एका ठिकाणी प्रक्रिये करुन त्यापासून उत्तम दर्जाचं खत तयार केलं. किमान एका एकरात तब्बल पाच टन खत झाल्याचx त्यांनी सांगितलं असून यामुळे गांडुळांची संख्या वाढून जमिनीचा पोत वाढतो आणि उत्पन्न वाढीस फायदा होतो असंही हिंगे म्हणाले.

प्रत्येक महिन्याला खतांची मात्रा ही ठरवून दिली जाते. रासायनिक खतांचा वापर हिंगे हे अत्यंत कमी करतात. तसेच, पाणी देखील गरजे प्रमाणे दिले जाते. सध्या त्यांना दुसऱ्या तोडणीमधून सव्वा दोन लाखांचे उत्पन्न मिळत आहे, तर अजून एकदा ऊसाचे असे मिळून तीन वेळेस एका लागवडीमधून उत्पन्न मिळत असल्याने संदीप हिंगे यांना ७ ते ८ लाखांचे उत्पन्न निघत आहे. दरम्यान हिंगे यांची प्रगतशील शेती पाहून शेजारील गावचे अनेक शेतकरी त्यांचा शेतीमध्ये ऊसाची पाहणी करण्यासाठी येत आहेत.