मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी संरक्षक बॅरिकेट्सला जाऊन धडकली यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मूनशीर आलम (वय ३४, रा. अंधेरी, मुंबई) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गहुंजे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात मुंबई-पुणे द्रुतमार्गावर स्विफ्ट गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात चालक मूनशीर आलम हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या व्यक्तिरिक्त गाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तो पुण्याच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती मिळते.
तर इतर दोन अपघात कामशेत बोगद्याजवळ झाले आहेत, यामध्ये किमी क्रमांक ७० आणि ७२ येथे हे अपघात झाले आहेत. भरधाव वेगात असणाऱ्या इर्टिगा गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली यामध्ये किरकोळ नुकसान झाले असल्याने ते निघून गेले. तर तिसऱ्या अपघातात होंडा सिटी गाडीने अज्ञात वाहनाला धडक दिली यात दोघे जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 12:09 pm