गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या घटना सुरू आहेत. गुरुवारी  कुदळवाडी येथे जुन्या टायरच्या गोदामाला दुपारी दीडच्या भीषण आग लागली होती,यात लाकडाचे आणि भंगारच्या गोदामाचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.  ४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

चिखली परिसरातील कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची गोदाम आहेत.याच ठिकाणी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली.काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले होते.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आणि चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाचे १३ बंब घटनास्थळी दाखल झाले होते,तर १० खासगी पाण्याचे टँकर होते.

आग लागण्याची ही पहिली घटना नसून या आधी देखील याच परिसरात कित्येक वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. महापालिका प्रशासन मात्र या भंगाराच्या दुकानांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार अनाधिकृत भंगार दुकानांचे स्थलांतर करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.