17 October 2019

News Flash

पुण्याच्या रस्त्यावर धावतेय सोनेरी कार…

आपण परिकथेतील एखाद्या राज्यात तर आलो नाहीत ना, अशी शंका सध्या पुणेकरांच्या मनात येत आहे.

| May 13, 2015 11:45 am

आपण परिकथेतील एखाद्या राज्यात तर आलो नाहीत ना, अशी शंका सध्या पुणेकरांच्या मनात येत आहे. कारण, सध्या पुण्याच्या रस्त्यावर चक्क सोन्याची कार धावताना दिसत आहे. एरवी पुणेकरांना रस्त्यावर अलिशान कंपन्यांच्या गाड्या पाहण्याची सवय आहे. मात्र, सध्या सोन्याची जग्वार, पुण्यातील गल्लीबोळातून वाट काढताना पाहून येथील जनतेला काहीसे आश्चर्य वाटत आहे. ही गाडी पुण्यातील बांधकाम व्यवसायिक सचिन खेसे यांच्या मालकीची असून त्यांना आता लोकांच्या या रोखून बघण्याची सवय झाली आहे. खेसे यांनी जग्वार एक्सएफ विकत घेतली तेव्हा ही गाडी काळ्या रंगाची होती. मात्र, खेसे यांनी ज्योतिषाच्या सल्ल्यापोटी तब्बल २ लाख रूपये खर्च करून या संपूर्ण गाडीला सोन्याचा मुलामा दिला. मात्र, मी हे सगळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले नाही असे स्पष्टीकरण खेसे यांनी दिले आहे. सोन्याचा मुलामा दिलेली ही जग्वार गाडी खेसेंनी ऑक्टोबर २०१४मध्ये तब्बल ६४ लाखांना विकत घेतली होती. मात्र, गाडी विकत घेतल्यानंतर माझ्या ज्योतिषाकडून काळा रंग माझ्यासाठी शुभ नसल्याचे सांगण्यात आले. मी त्यांचा कोणताही सल्ला टाळत नसल्याने मी गाडी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, गाडी विकण्यासाठी मी दुकानात गेलो असताना मला दुकानदाराने ‘गोल्ड रॅप’ प्रक्रियेचा पर्याय सुचवल्याचे खेसे यांनी सांगितले. सुरूवातीला मी गाडीला स्टीलच्या रंगाचा मुलामा देणार होतो. परंतु, दुकानदाराने मला गाडीला सोन्याचा मुलामा देण्यासाठी राजी केल्याचेही सचिन खेसे म्हणाले.
विशेष म्हणजे खेसेंकडे ही एकमेव अलिशान गाडी नाही. त्यांच्याकडे अशाप्रकारच्या तब्बल १२ अलिशान गाड्या असून या ताफ्यामध्ये मर्सिडीज एस क्लास आणि रेंज रोव्हरसारख्या गाड्यांचाही समावेश आहे. गाड्यांना सोन्याचा मुलामा देण्याचा प्रकार मध्य आशियात चांगलाच रूळलेला आहे. मात्र, पुण्यामध्ये ही पहिलीच सोन्याची कार असावी. मी या सगळ्याची प्रसिद्धी करण्याचे टाळतो, त्यासाठी मी कधी सोशल मीडियावरही या गाडीची छायाचित्रे प्रसिद्ध केलेली नसल्याचे सचिन खेसे यांनी सांगितले. पुण्यामधील प्रतिष्ठित आणि धनाढ्यांमध्ये खेसे कुटुंबियांचे नाव घेतले जाते. सचिन खेसे यांचे काका पांडुरंग खेसे हे पुणे बाजार समितीचे अध्यक्ष आणि साखर कारखान्याचे मालक आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशीही खेसे कुटुंबियांचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते.

First Published on May 13, 2015 11:45 am

Web Title: a golden jaguar prowls pune roads
टॅग Pune 2