एकापाठोपाठ सिलिंडरच्या स्फोटाने परिसरात घबराट
श्रमजीवींची वस्ती म्हणून ओळख असलेल्या मंगळवार पेठेतील भीमनगर परिसरात आग लागून पन्नास झोपडय़ा भस्मसात झाल्या. एकापाठोपाठ स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवित आग आटोक्यात आणली. दरम्यान, अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणताना अडथळे आले. या घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मंगळवार पेठेतील भीमनगर परिसरात दाटीवाटीने झोपडय़ा आहेत. पत्रे आणि लाकडाचा वापर करून झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास एका झोपडीला आग लागली. त्यानंतर एकापाठोपाठ झोपडय़ा पेटत गेल्या. त्यामुळे रहिवासी लहान मुलांसोबत रस्त्यावर धावत आले. झोपडय़ांमधील स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर बाहेर काढता न आल्याने स्फोट झाले. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या कसबा केंद्राला ही माहिती कळविण्यात आली. तेथील बंबगाडी नादुरुस्त असल्याने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली होती. आग पसरत चालल्याने तातडीने अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातून पंधरा बंब घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्यात अडथळे आले. पाण्याचा मारा करून अडीच तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. आग आटोक्यात स्थानिक रहिवाशांनी जवानांना साहाय्य केले. आग आटोक्यात आणताना चार जण किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. तातडीने पोलीस बंदोबस्त मागवून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. जळीतग्रस्तांना तातडीने मदत करण्याचा सूचना देण्यात आल्या; तसेच झोपडय़ा बांधण्यासाठी बांबू, पत्रे असे साहित्य पुरविण्याचे आदेश महापौर जगताप यांनी प्रशासनाला दिले.

नागझरीतून पाणी खेचले
पाण्याचा तुटवडा जाणवल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी भीमनगर वसाहतीनजीक असलेल्या नागझरी नाल्याचे पाणी मोटारीच्या साहाय्याने खेचून पाण्याचा मारा केला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आली. त्या वेळी तेथील रहिवाशांना जळालेले संसारोपयोगी साहित्य पाहून अश्रू अनावर झाले. दरम्यान, भीमनगर वसाहतीत लागलेल्या आगीमागचे कारण समजू शकले नाही.