गौरी गणपतीचे हार आणि फुले इंद्रायणी नदीत टाकण्यास गेलेला व्यक्ती नदीमध्ये बुडल्याची घटना घडली आहे. विष्णू सर्जेराव पाटील अस वाहून गलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांनी गौरी गणपतीचे हार आणि फुले नदीत टाकले, मात्र त्यात सोन्याचा दागिना गेला असल्याचं समजताच त्यांनी नदीमध्ये उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते बुडाले. अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विष्णू सर्जेराव पाटील हे पिशवीमध्ये गौरी गणपतीचे हार आणि फुले इंद्रायणी नदीमध्ये टाकण्यासाठी घाटावर गेले होते. त्यांच्यासोबत भाऊ आणि इतर एक मित्र होता. विष्णू यांनी हार आणि फुलांची पिशवी नदीमध्ये टाकली. पण, त्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्या पिशवीमध्ये सोन्याचा दागिना आहे. तेव्हा, विष्णू यांनी कोणताही विचार न करता थेट पाण्यामध्ये उडी घेतली अन पिशवी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त होता त्यामुळे ते बुडायला लागले. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी भाऊ शंकर सर्जेराव पाटील यांनी नदीमध्ये उडी घेतली. पण त्यांना देखील दम लागला, दरम्यान त्यांच्यासोबत आलेला मित्र राहुल पाटील यांनी पाण्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली. परंतु, दोघांनाही दम लागल्यामुळे ते दोघे ही नदीच्या कडेला आले. अखेर  विष्णू सर्जेराव पाटील हे बुडाले. त्यांचा शोध स्थानिक रहिवासी,  बोटिंग करणारे असे सर्व जण मिळून घेत आहेत. अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे.