पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नव्या कोऱ्या महागड्या बुलेट चोरून त्या फेसबुकच्या माध्यमातून उस्मानाबाद, धुळे, बीड आणि अहमदनगर येथे १० ते १५ हजार रुपयांत विकणाऱ्या चोरट्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १७ लाखांच्या १४ दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून त्यात नव्या १० बुलेट आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हेमंत राजेंद्र भदाणे (वय २४, रा. सातपूर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर ठाणे आणि नाशिक येथे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. हेमंत आपला सहकारी योगेश सुनील भामरे (वय २४, रा. धुळे) याच्या मदतीने बुलेट संबंधित ठिकाणी नेऊन विकायचा.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी हेमंतला भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी आणि बुलेट चोरल्याचे पोलिसांना सांगितले. लॉकडाउनच्या काळात हेमंत नाशिकहून पुण्यात आला होता. दरम्यान, त्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातून प्रत्येकी २ लाख रुपये किंमत असणाऱ्या १० नव्या कोऱ्या बुलेट विविध ठिकाणांहून चोरल्या.

लॉकडाउन असल्याने हेमंतने फेसबुकवरून ग्राहकांशी संपर्क साधत दुचाक्यांची कागदपत्रे नंतर देतो असे सांगून योगेशच्या मदतीने उस्मानाबाद, बीड, धुळे आणि अहमदनगर येथे या बुलेट कवडीमोल किंमतीत विकल्या. दरम्यान, ग्राहकांशी संभाषण झाल्यानंतर फेसबुकवरील संभाषण तो डिलीट करत होता, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकारांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.