पतीने दुसरे लग्न केले म्हणून रागाच्या भरात पत्नीने दीड महिन्याच्या मुलीस पिशवीमध्ये ठेवून कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. पण काही वेळात पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील चांभळी गावच्या एका महिलेच्या पतीने दुसरे लग्न केले. यामुळे घरात वाद झाला. हा राग मनात धरून दीड महिन्याच्या मुलीस पिशवीमध्ये ठेवले. त्यावर जाड कापड टाकण्यात आले. घरातून निघून सासवड रोडवरील मंतरवाडी परिसरात एक महिला बाळाला घेऊन जात असल्याचे काही नागरिकांना दिसले. बाळाला त्या महिलेने चोरून आणल्याचा संशय नागरिकांना आल्याने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच दामिनी पथकाची टीम काही वेळात घटनास्थळी दाखल झाल्यावर महिलेकडे केलेल्या चौकशीत वरील सर्व माहिती समोर आली आहे. तर त्या महिलेने त्यावेळी नशा देखील केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महिलेच्या जवळील मोबाइलवरून कुटुंबीयांना कळविण्यात आले. तेथून लगेच एका खासगी रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, बाळ आणखी काही वेळ पिशवीत राहीले असते. तर अनर्थ झाला असता, असे त्यांनी सांगितले. बाळावर उपचार करून बाळाच्या मामाच्या ताब्यात सुखरूप दिले असून महिलेला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.  ही कामगिरी भरोसा सेल मार्फत करण्यात आली असून बाळाचे प्राण वाचल्याने, या कामगिरीचे विशेष कौतुक केले जात आहे.