माणगावातील बोडकेवाडी येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर दाम्पत्याचा दीड वर्षांचा मुलगा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
संदीप शावाप्पा नाटेकर (वय दीड, सध्या रा. बोडकेवाडी, माणगांव, ता. मुळशी )असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. शावाप्पा नाटेकर मूळचा कर्नाटकातील आहे. बोडकेवाडीतील वीटभट्टीवर नाटेकर आणि त्यांची पत्नी मजुरी करतात. तेथे असलेल्या छोटय़ा घरात नाटेकर राहायला आहेत. त्यांच्या घराला दरवाजा नाही. शुक्रवारी (१२ फेब्रुवारी ) नाटेकर दाम्पत्य घरात झोपले. मध्यरात्री संदीप झोपेतून जागा झाला आणि खेळत बाहेर गेला. परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुरडय़ा संदीपवर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आवाज ऐकून त्याचे वडील झोपेतून जागे झाले. संदीप याला रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच तो मरण पावला होता.
दरम्यान पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहर परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद घातला आहे. वर्षभरापूर्वी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. भटक्या कुत्र्यांनी सर्वत्र उच्छाद घातल्यामुळे नागरिकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.