उन्हाळा हळू हळू जोर धरायला लागला आहे, वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी लोक विविध पर्यायांचा वापर करताना पहायला मिळतात. अशीच एक भन्नाट आयडीया पुण्यातील एका रिक्षा चालकाने लढवली आहे. आपल्या प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये तसेच त्यांना हिरवाईने नटलेल्या एका बागेत बसल्याचा फील मिळावा यासाठी त्यांनी आपल्या रिक्षावर हिरवाईचा साज चढवला आहे. ही रिक्षा पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

रविवारी पेठेत राहणारे इब्राहिम तांबोळी यांची ही रिक्ष आहे. प्रवाशांना आरामदायी आणि थंडगार सेवेचा फील मिळावा यासाठी त्यांनी आपल्या रिक्षामध्ये कृत्रिम हिरवेगार गवत, फुलं आणि झाडांची सजावट केली आहे. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला. या रिक्षाची पुणे शहरात सर्वत्र चर्चा असून अशा अनोख्या सजावटीचे नागरिकांकडूनही कौतूक होत आहे.

याविषयी रिक्षा चालक तांबोळी म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मी रिक्षा चालवत असून प्रवाशांना चांगली सुविधा दिली जावी यासाठी मी कायम आग्रही असतो. आता उन्हाळाही वाढू लागल्याने याचा प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी काय करता याचा मी विचार करीत होतो. त्यानुसार, आपली रिक्षा हिरवाईने सजवण्याची कल्पना मला सुचली आणि त्यावर मी काम सुरु केले. माझ्या रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चांगल्या कामाची पावतीही मला मिळत आहे. त्यामुळे खूपच समाधान वाटते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. तसेच निसर्गाची आवड असल्याने गाडीमध्ये बदल केला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


तांबोळी यांच्या रिक्षात गवत, फुले, झाडांची सजावट, एलईडच्या माध्यमातून विविध प्राण्यांची छायाचित्र दाखविण्यात आली आहेत. याकडे प्रवाशीही आकर्षित होत आहेत त्यामुळे तांबोळी याच्या व्यवसायालाही चालना मिळाली आहे. पूर्वी रिक्षात बसल्यानंतर प्रवाशी सतत मोबाईलवरच असायचे मात्र, आता रिक्षात बसल्यानंतर आपल्या या कामगिरीचे ते कौतुक करत असतात असे तांबोळी यांनी सांगितले.