पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत कालच पतंगाच्या मांजाने एका चिमुकल्याचा डोळा कापला गेल्याची घटना घडलेली असताना पुन्हा एकदा येथेच आणखी एक व्यक्ती धारदार मांजामुळे गंभीर जखमी झाली आहे. मांजामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापला गेला असून ते थोडक्यात बचावले आहेत.

रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (वय ६२, रा. ज्ञानेश्वर वसाहत, काळेवाडी) हे बुधवारी सायंकाळी सहा वाजता दुचाकीवरून चिंचवडच्या दिशेने निघाले होते. काळेवाडीच्या डी मार्ट येथील सिग्नलवर ते थांबले. तेव्हा अचानकपणे मांजा त्यांच्या चेहऱ्यावर आला, मांजाने त्यांचा चष्मा खाली पडला आणि तो त्यांच्या गळ्याला अडकला. पतंग उडवणारा मांजा खेचत असल्याचा भास यावेळी रंगनाथ यांना झाला. त्यांनी तत्काळ हाताने मांजा बाजूला केला अन्यथा त्यांचा गळा कापला गेला असता. मात्र, यात त्यांच्या गळ्याला आणि हाताच्या बोटाला कापले आहे. त्यांच्या गळ्याला दोन टाके तर उजव्या हाताच्या बोटाला सहा टाके पडले आहेत. रंगनाथ भुजबळ हे निवृत्त शिक्षक आहेत.

मंगळवारी याच काळेवाडीच्या राजवाडेनगरमध्ये तीन वर्षीय हमजा खान या चिमुकल्याचा डोळा मांजामुळे कापला गेला होता. त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हा त्याच्या वडिलांनी मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीच ही घटना घडली समोर आली आहे.