शतपावली करून घराकडे निघालेल्या जेष्ठ नागरिकाला अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन किरदकरवे (वय-६५) असे अपघातात मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवराम अर्जुन किरदकरवे (वय-२४) याने फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी अर्जुन किरदकरवे (रा.यशवंत नगर, पिंपरी) हे शतपावली करून घराच्या दिशेने जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मुलगा शिवराम याने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बोचरे करत आहेत.